महामार्गाचे महाधिंडवडे!

महामार्गाचे महाधिंडवडे!

संपादकीय

क्रमांक ६६ या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन एक तप उलटून गेले आहे. जणू काही देशांना जोडणारा हा आंतरराष्ट्रीय मार्ग असावा अशा थाटात त्याचे काम सुरू आहे. गाजावाजा करत या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. जमीन संपादन आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की जवळपास साडेपाचशे किलोमीटरचा पळस्पे ते बांदा इथपर्यंतचा हा मार्ग चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल आणि एरव्ही रडत-खडत होणारी वाहतूक सुसाट होईल अशी अटकळ बांधली गेली होती. प्रत्यक्षात बारा वर्षे उलटून गेली तरी हा मार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नसून खर्‍या अर्थाने हा मार्ग पूर्ण होण्यास अजून दोन ते तीन वर्षे लागतील असे बोलले जात आहे. कारण काही ठिकाणी जमिनीचा वाद सुरू आहे. पनवेलच्या पळस्पे येथून सुरू होणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.

हा मार्ग केवळ गोवा राज्यापर्यंत नाही तर पुढे कर्नाटक, केरळातून तामिळनाडूत पोहचतो. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या मार्गावरून नेहमीच मोठ्या प्रमाणात होत आली आहे. कोकणात वाढलेले औद्योगिक क्षेत्र आणि विविध आकर्षक पर्यटन स्थळे यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ दुतर्फा अव्याहतपणे होत आहे. गणेशोत्सव, होळी आणि नाताळमध्ये प्रवासी वाहनांची संख्या वाढते. हा मार्ग पूर्वी तासंतास वाहतूक ठप्प करून ठेवत असे. म्हणून चौपदरीकरणाचा प्रस्ताव पुढे आला आणि काम सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली याचे काम सुरू झाले. केंद्रात रस्ते वाहतूक खाते नितीन गडकरी यांच्याकडे असल्याने आणि त्यांच्या कामाचा उरक पाहता मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्यास काहीच अडचण असणार नसल्याचे म्हटले गेले, पण कूर्मगतीने सुरू असलेले काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.सध्या या महामार्गाचे भिजत घोंगडं पडणं ना शासनाला शोभा देणारे, ना लोकप्रतिनिधींना शोभा देणारे आहे. मार्गाच्या रखडलेल्या कामाची खरं तर गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे.

देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांची कामे भन्नाट वाटावी अशा वेगाने पूर्ण झाली. काही मार्गांवर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर उतरविण्याचे प्रात्यक्षिकही झाले. मुंबई ते गोवा मार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत की तेथून प्रवास नकोसा वाटतो. तळकोकणात खासगी वाहने कोल्हापूर मार्गावरून नेणे पसंत केले जात आहे. मध्यंतरी अपूर्ण कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याकडेही लक्ष वेधले गेले. तरीही कामाचा वेग वाढलेला नाही. नोकर बदलावेत त्याप्रमाणे ठेकेदारही बदलून झाले. यातून काही निष्पन्न झालेले नाही. वेळ, इंधन याची नासाडी परवडणारी नसली तरी ती होतेय ही वस्तुस्थिती आहे.

एकीकडे औद्योगिकीकरण, पर्यटनाला चालना द्यायच्या गप्पा होत असताना यात दर्जेदार रस्ते ही पायाभूत सुविधा नसेल तर त्या गप्पांना काही अर्थ उरत नाही. कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता रस्ते दर्जेदार आणि भक्कम असावेत असेच कुणीही म्हणेल. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी म्हणून राजकीय नेते एकत्र येऊन केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करताहेत असे चित्र अभावाने दिसते. आज हेच नेते कुरघोड्या करण्यात आणि एकमेकांवर तुटून पडण्यात धन्यता मानत आहेत. परवा खेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची एक लेन मेपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. म्हणजे एका लेनवरून सुखाचा प्रवास आणि दुसरीकडे कंटाळवाणा प्रवास अशी स्थिती होणार आहे. रस्ते बांधणीत वेगवान आणि आधुनिक तंत्रज्ञान आल्याचे म्हटले जाते ते इथे वापरण्याची गरज आहे.

विधिमंडळात या मार्गाची अनेकदा चर्चा झाली आहे. असे ‘भाग्य’ लाभणे एखाद्याच रस्त्याच्या नशिबी येत असेल. भाजपचे आमदार, जे कोकणातीलच आहेत, प्रवीण दरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे महामार्गाच्या दिरंगाईबाबत लक्ष वेधले तेव्हा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही पावसाळ्यापूर्वी एका लेनचे काम पूर्ण होईल, असे सांगितले. सिंधुदुर्गातील काम पूर्ण झाले असून रायगड आणि रत्नागिरीत बरेचसे काम बाकी आहे. पावसाळा सुरू झाला की काम थांबणार आहे. तोपर्यंत गणेशोत्सव येईल. मग नेहमीप्रमाणे मंत्री भेटीसाठी येतील, आश्वासनांचा पाऊस पडेल. चाकरमानी आणि नेहमीच्या प्रवाशांचा प्रवास तोच तो नेहमीसारखा होईल. दरवर्षी हेच चालले आहे. जनतेची यावर तीव्र नाराजी आहे. लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडले जात आहेत.

अनेकदा आंदोलनेही झाली, मात्र आंदोलनांची दखल घ्यावी इथपर्यंत कोणतेही सरकार संवेदनशील राहिलेले नाही. कोकणात अवकाळीने तडाखा दिल्यामुळे या मार्गाची आणखी वाताहात होणार आहे. पाऊस नसला की धुरळा आणि पाऊस असला की खड्डे असे एकूण दुष्टचक्र आहे. स्वाभाविक हा महामार्ग कायम टीकेच्या भोवर्‍यात सापडलेला आहे. कोणत्याही प्रमुख मार्गाचे इतके धिंडवडे निघाले नसतील. कोकणात पर्यटन आणि कारखानदारी बहरत असताना प्रमुख मार्ग असा कूर्मगतीने तयार होणार असेल तर साराच आनंद आहे. आजमितीला या मार्गाचे सुरू असलेले काम आणि त्याची गती यावर सर्वजण नाक मुरडत आहेत. आश्वासनांचा खेळ करून जनतेच्या मनातील संतप्त भावना शांत होतील, असे कुणाला वाटत असेल तर तो निव्वळ भ्रम आहे.

First Published on: March 23, 2023 4:30 AM
Exit mobile version