कान, डोळे उघडे राहू देत!

कान, डोळे उघडे राहू देत!

संपादकीय

स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोमवारी देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील मुख्य समारंभात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाच्या विकासासाठी ‘पंचप्राण’ फुंकले आहेत. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भ्रष्टाचार, घराणेशाही यावर आसूड ओढले. त्यांच्या या भाषणावर अर्थातच काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराच्या मुद्याला स्पर्श केला ते बरे झाले. सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्यात सरकारी कार्यालये आघाडीवर आहेत. पैसे चारल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, ही सामान्याची व्यथा आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोणती तरी उपाययोजनाही पंतप्रधान मोदी यांनी सुचवायला पाहिजे होती. खासगी क्षेत्रातही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरला आहे.

ठेकेदारीची कामे घेताना घसघशीत रकमांची देवाण-घेवाण होत आहे. यातून कामाचा दर्जा कसा असणार, हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या रस्त्यांची चर्चा आहे. प्रवासाला नेहमीपेक्षा दुपटी-तिपटीने वेळ लागत आहे. वाहनांचे मातेरे होत असताना दुसरीकडे इंधनाची नासाडी होत आहे. अव्याहत वर्दळ असलेल्या मुंबई-पुणे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांना खड्ड्यांनी पोखरून टाकल्याने वाहनचालक, प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी उच्च स्तरावरून खड्डे भरण्याचा फतवा निघाला आहे. मुंबईत बसून असे फतवे काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रांत दर्जाचा अधिकारी किंवा जिल्हाधिकारीही संबंधित ठेकदारांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर खड्डे भरण्याचे आदेश देऊ शकतात. त्यासाठी मंत्रालय स्तरावरूनच आदेश देण्याची हौस भागविण्याची गरज नाही.

गणेशोत्सव तोंडावर असल्याने तळकोकणात जाणार्‍या वाहनांच्या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होणार आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था इतकी दयनीय आहे की त्यावरून प्रवास करणे नकोसे झाले आहे. तीच गत मुंबई-पुणे मार्गाची आहे. या मार्गांची दुरवस्था पाहिल्यानंतर प्रवास करणार्‍यांना कुणी वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित होतो. महाराष्ट्रात नुकतेच नव्याने मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहण्यासाठी एखाद दिवशी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या सर्व सहकार्‍यांना अशा टुकार रस्त्यांवरील सैर घडवून आणावी. सत्तेत आलेल्या आघाडीचा जन्मच मुळी विविध ठिकाणची सैर घडल्यानंतर झाला आहे. त्यामुळे आणखी एक सैर होऊन जाऊ देत. मात्र ही सैर करताना सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियाही सर्व मंत्र्यांनी काळजीपूर्वक ऐकाव्यात. पंतप्रधानांना नको असलेला भ्रष्टाचार प्रत्येक रस्त्यात जागोजागी मुरला आहे. यासाठी संबंधित ठेकेदारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येणार नाही. त्या-त्या वेळचे सत्ताधारीही याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

रोड टॅक्स, शिवाय टोल भरणार्‍यांना नादुरुस्त रस्त्यांवरून प्रवास करायला भाग पाडणारे हे महाभाग जनतेच्या तिरस्काराचा विषय ठरले आहेत. फक्त ही जनता आता मुकी झाल्याने या महाभागांचे फावले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची धामधूम सुरू असताना दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे वास्तव जुळ्या भावंडांच्या मृत्युनंतर समोर आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने गर्द झाडी, डोंगर रांगांतून दुर्गम भागातही सैर करावी आणि तेथील जनता कशी हालाखीचे जीवन जगतेय याचा ‘याची डोळा’ अनुभव घ्यावा. दुर्गम भागातील रुग्णाला आजही डोलीतून उपचारासाठी न्यावे लागत आहे. फुकटात वैद्यकीय सेवा लाटणार्‍यांनी या जनतेचा विचार केला पाहिजे. ऊठसूठ भाषणांतून विज्ञानाचा डंका पिटला म्हणजे प्रगती झाली असे नव्हे. दुर्गम भागात शिक्षणाचीही आबाळ आहे. तेथे शाळांच्या इमारती झाल्या. प्रत्यक्षात परिस्थिती कशी आहे, याची जाणीव सर्व मंत्र्यांना यानिमित्ताने होईल. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात लहान मुलांना पावसाळ्यात नदी कशी पार करावी लागते, याचे विदारक चित्र दिसते.

ते जर खरे असेल तर विज्ञानाने प्रगती केली ती हिच काय, असा सवाल नक्कीच उपस्थित होईल. अर्थात रस्ते, आरोग्य व्यवस्था हे काही भाग झाले. अशा कितीतरी समस्या आहेत, की त्यांच्या मुळाशी गेल्यानंतर शरमेने मान खाली जाईल. अनेक प्रश्न ‘आ’ वासून समोर असताना आपल्याकडे मूळ मुद्यावरून किंवा दुखर्‍या नसेवरून इतरत्र लक्ष हटविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आता कमी की काय म्हणून सरकारी कार्यालयात फोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्याची घोषणा नूतन सांस्कृतिक मंत्र्यांनी केली. यावर वाद निर्माण झाला. रझा अकादमीने तर याला ठाम विरोध दर्शविला असून, काँग्रेसने ‘जय बळीराजा’ म्हणण्याची घोषणा करून टाकली. राज्यापुढे गहन समस्या असताना असले पोरकट विषय पुढे आणण्याची अजिबात गरज नाही. वंदे मातरम्, जय बळीराजा किंवा अजून काही म्हटल्याने समस्या सुटणार असतील तर मग आनंद आहे.

राज्यात सत्तांतर नाट्य पार पडल्यानंतर जनतेच्या प्रतिक्रिया किती तीव्र आहेत, याचा सत्तेत बसलेल्यांनी एकदा अनुभव घेऊन पहावाच. शेतकर्‍यांच्या मागण्या, युवकांची बेरोजगारी, कामे करताना द्यावी लागणारी चिरमिरी असे एक ना हजार प्रश्न समोर असताना नेत्यांच्या वर्तनात बदल होत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. नुसते झेंडे फडकावून किंवा घरोघरी झेंडे लावून देशभक्ती वाढेल असे समजणे निव्वळ भ्रम आहे. ज्यावेळी तळागाळापर्यंतच्या माणसाला दोन वेळचे पोटभर अन्न मिळेल, बेकार तरुणांच्या हाताला काम मिळेल, तेव्हाच खर्‍या अर्थाने देशभक्ती वाढीस लागेल. आपली मानसिकता उत्सवप्रिय अशी झाली आहे. त्याचा चपखल वापर चाणाक्ष राजकारणी मंडळी करून घेत आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी तिरंगा तयार करण्यासाठी प्रचंड आर्थिक उलाढाल झाली असून, यामागील सुरस कथा हळूहळू समोर येत आहेत. यावरून सुरू असलेल्या चर्चांची व्याप्ती वाढू शकते. हाती तिरंगा घेऊन अनेकजण आनंद घेत असताना काहींनी तिरंगा तयार करण्याच्या कामात जर हात धुवून घेण्याचे काम केले असेल तर हिच काय ती देशभक्ती, असे विचारण्याची वेळ येऊ नये म्हणजे मिळवली! कित्येकांना विविध समस्यांनी ग्रासलेले असताना भाषणबाजीतून त्यावर तोडगा निघेल असे नाही. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या मंत्रिमंडळाने कान, डोळे उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे. सवंग घोषणांना जनता वैतागली आहे. महागाई, भ्रष्टाचार याच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला व्यवहार्य निर्णयांची अपेक्षा आहे.

First Published on: August 17, 2022 5:00 AM
Exit mobile version