ठाण्याची घेराबंदी…

ठाण्याची घेराबंदी…

संपादकीय

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाच्या पेचावर सध्या तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील काही मुद्दे अद्याप निकाली निघालेले नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होतील, यावर कुणालाही ठोसपणे काही सांगता येणार नाही. निवडणुका या वर्षाच्या अखेरपर्यंत लागतील की थेट पुढच्या वर्षी याबाबतचा संभ्रम कायम असताना राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. मग ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची असो वा विधानसभेची. आपण कुठल्याही निवडणुकीसाठी तयार आहोत, अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतलेली दिसते. परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्‍याला मोठ्या दणक्यात सुरूवात केली. त्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची अत्यंत जाणीवपूर्वक निवड केली. यावेळी पवारांनी ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठकही घेतली.

या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घालत केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपवर कडाडून टीका केली. पण त्याचसोबत त्यांनी ठाणे हा महाराष्ट्रातील वेगळा जिल्हा असून जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याची गरज आहे, असे म्हणत ठाण्याकडे यापुढे आपले अधिक लक्ष राहील, असे नमूद केले. शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटात सामील सर्वच नेत्यांना आव्हान दिले आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका पवार यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजेच शिंदे गटाचा बिमोड करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने येथे राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडणूक लढवावी, अशीही कदाचित पवारांची इच्छा असू शकेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे यावर राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असली, तरी यावर शिवसेनेकडून अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाशी जवळीक करून मविआपासून चार हात लांब राहण्याचा विचार यामागे उद्धव ठाकरेंचा असल्याचेही म्हटले जात आहे. यात नेमके किती तथ्य आहे, हे येणार्‍या निवडणुकीतच कळेल. पवारांपाठोपाठ गणेशोत्सवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील आपल्या दौर्‍याची सुरूवात ठाण्यातूनच करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून पुढील निवडणुकांसाठी विरोधकांचा प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा रोख ठाण्याची घेराबंदी करण्याकडेच राहील हे स्पष्ट होत आहे. पण आजच्या घडीला ही घेराबंदी करणे वाटते तितके सोपे नाही. कारण शिंदे गटाच्या मागे भाजपने आपली सगळी शक्ती लावलेली आहे. आपल्या मागे महाशक्ती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला असताना सांगितले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य आमदार, नगरसेवक, पदाधिकारी एवढेच नाही, तर कार्यकर्तेही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जागी केदार दिघे यांची जिल्हाप्रमुख पदावर निवड करण्याचा निर्णय अतिशय चाणाक्षपणे घेतलेला आहे. परंतु हा निर्णय सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी दिघे यांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. ही जबाबदारी ते स्वत: किती समर्थपणे पेलतात, यावरच उद्धव ठाकरे गटाचे ठाण्यातील राजकीय भवितव्य ठरणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसमोर पक्ष संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठीच आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यानंतर तेदेखील लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या काळात शिवसेना मजबूत करण्यासाठी आपले सर्व कसब पणाला लावावे लागणार आहे.

पुण्यानंतर सर्वाधिक १८ विधानसभा मतदारसंघ असलेला, त्याचप्रमाणे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ६ महापालिका असलेला ठाणे जिल्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरतो. कारण सहाही महापालिकांमध्ये भाजपबरोबरीनेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. या ६ महापालिकांपैकी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. नवी मुंबई महापालिका कधीकाळी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. परंतु आमदार गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर सध्या या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि मिरा-भाईंदर अशा तिन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आहे, परंतु या सर्व महापालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकदही चांगली आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी ही असेल की यातील सर्वच महापालिकेतील बहुतांश नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असल्याने शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होणार आहे. शिवसेना आमचीच असा दावा करणार्‍या शिंदे गटातून शिवसेनेचे दादर पश्चिमेकडील शिवसेना भवनावर दावा करण्यात येणार का? अशा चर्चा झडत असताना शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी अचानक दादरमध्येच दुसरी जागा घेऊन तिथे प्रतिशिवसेना भवन उभारणार असल्याचे म्हटले होते. यावरून सुरू असलेली चर्चा थांबत नाही, तोच शिंदे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून आनंद आश्रम हे नाव पुढे आले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते दोन नेत्यांची नावे प्रामुख्याने घेत आहेत. त्यातील पहिले नाव आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि दुसरे नाव म्हणजे ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे. त्यामुळे ठाण्यात आनंद आश्रम या जागेला राजकीय आणि सामाजिकदृष्ठ्या विशेष महत्व आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मुंबई विभाग-११ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या नियुक्तीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जे लेटरहेड वापरण्यात आले होते, त्यात एकनाथ शिंदे यांचा मुख्यनेता असा उल्लेख होता, तर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय – आनंदआश्रम, श्री भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे (पश्चिम)-१, असा पत्ता देण्यात आला होता. एकनाथ शिंदे किंवा गटातील इतर प्रवक्त्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आनंद आश्रम हेच सध्याच्या काळातील शिंदे गटाचे मुख्यालय असेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे इथे शिंदे गटाला राजकीय आणि भावनिकदृष्ट्या नमवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला करावे लागणार आहे. ठाकरे आणि पवारांच्या ठाणे दौर्‍यावरुन शिंदे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे आणि पवारांनी ठाण्याचीच निवड केल्याने एकनाथ शिंदेंसमोरही मोठे आव्हान असणार आहे.

First Published on: September 2, 2022 4:53 AM
Exit mobile version