कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट

कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट

आत्माराम रावजी भट हे महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत होते. त्यांचा जन्म १२ मे १९०५ रोजी रत्नागिरीमध्ये झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे झाले. महाविद्यालयात असताना युवक चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. सत्याग्रहात सामील झाल्याने त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला. १९२९ मध्ये मुंबई विद्यापीठाची एम. कॉम पदवी संपादन केल्यावर ते पुणे येथे मराठा संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले.

१९५२ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून येईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. बारा वर्षे ते विधानसभेचे सदस्य होते. १९५२ मध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या पहिल्या ‘वृत्तपत्र आयोगा’चे ते सदस्य होते. १९५४ मध्ये ब्राझील देशात भरलेल्या पहिल्या जागतिक वृत्तपत्र परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश झाला होता. त्यांनी १९३४ मध्ये पुणे येथे ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. महाराष्ट्रातील कारखानदारी फुलावी, नवे उद्योजक निर्माण व्हावेत व त्यांना सर्व तर्‍हेचे प्रोत्साहान मिळावे, अशी चेंबर स्थापण्यामागील त्यांची भूमिका होती.

स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याभोवती कारखानदारीची जी झपाट्याने वाढ झाली, त्यात चेंबरचा मोलाचा वाटा आहे. ‘बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट’ व कोयना प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या कामी चेंबरने महत्त्वाचा वाटा उचलला. १९६३ मध्ये भट यांनी भारतातील लघुउद्योगांची सोळाशे पृष्ठांची सूची तयार केली. भारतात लघुउद्योग संवर्धनाचे धोरण आखण्याच्या बाबतीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अशा या थोर विचारवंताचे १८ जानेवारी १९८३ रोजी निधन झाले.

First Published on: May 12, 2023 4:15 AM
Exit mobile version