सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग

सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग

भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील बंग या गावी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी. ए. झाले (१९२३). विद्यार्थीदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता, परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही.

गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रौलेट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. संघटितरीत्या कार्य करणार्‍या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). या साथीदारांच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या.

पुढे दोन अन्यायकारक विधेयकांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी प्रेक्षक सज्जातून सभागृहात बॉम्ब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. त्यांच्यावर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. भगतसिंगांना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०) पण पुढे खास न्यायाधीकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ ऑक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव उर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली.

First Published on: September 27, 2022 7:36 AM
Exit mobile version