ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर

ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर हे मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपटसंगीत यांतील ख्यातनाम संगीतकार व गायक आहेत. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी प्रख्यात गायक नट मास्टर दीनानाथ मंगेशकर व शुद्धमती या दाम्पत्यापोटी पुणे येथे झाला. हृदयनाथांच्या बालपणीच दीनानाथांचे निधन (१९४२) झाल्याने त्यांना वडलांचा फारसा सहवास व प्रत्यक्ष तालीम मिळाली नाही; पण वंशपरंपरेने आलेला संगीतवारसा, शास्त्रीय संगीताची उस्ताद अमीरखाँ यांच्याकडून घेतलेली तालीम, आपल्या समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास व स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीतशैली आकारास आली. त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘निसदिन बरसात नैन हमारे’ व ‘बरसे बुंदिया सावन की’ या भक्तिगीतांना स्वरसाज चढविला.

संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मानणार्‍या हृदयनाथांना त्या वेळच्या बहुतेक सर्व महत्वाच्या संगीतकारांचा सहवास व काहींची मैत्री लाभली; त्यामुळे त्यांची मूळचीच वेगळी संगीतशैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली. या शैलीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत तसेच पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाफ होतो. या शैलीने विशेषत: भावसंगीताच्या परंपरेला एक सुरेल छेद देऊन, रसिकांसमोर सुरांचे, लयीचे व भावांचे एक वेगळे प्रकटीकरण सिद्ध केले.

‘कशी काळ नागिणी’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’, ‘दे मला गे चंद्रिके’, ‘ये रे घना’, ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’, ‘घनतमीं शुक्र राज्य करी’, ‘माझे गाणे’, ‘ही वाट दूर जाते’, अशी कित्येक गीते याचे उदाहरण म्हणून सांगता येतील. हृदयनाथांनी आपल्या विस्तृत संगीत अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर आदी संतकवींबरोबरच भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, स्वा. सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, ना. धों. महानोर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश केला.

First Published on: October 26, 2022 6:00 AM
Exit mobile version