प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग सुखात्मे

प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग सुखात्मे

डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांना १९७१ मध्ये भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा जन्म २७ जुलै १९११ रोजी सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला.

१९३२ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून गणित विषयात पदवी मिळवली. लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पीएच.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारे शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडले. त्यासाठी लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सर्वेक्षणाचे पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इत्यादी सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणार्‍या मूलभूत प्रश्नांकडे आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

भारतात परतल्यावर ‘अखिल भारतीय स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य’ या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली. पुढे दिल्लीच्या ‘भारतीय कृषीसंशोधन मंडळात’ (आय.सी.ए.आर.) संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणी व जीवमितीशास्त्र या दोन्हींत बारकाईने लक्ष घातले.

त्या आधारे उत्तर प्रदेशातल्या इटाह इथे ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या प्रमुखत्वाखाली चाललेला शेळीच्या दुधाचा, तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प, वार्षिक संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचा सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणे अधिकार्‍यांना जड गेले, पण नंतर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांनाच देण्यात आली. नंतर एफएओचे संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ मध्ये रोम येथे रुजू झाले. एफएओत दाखल झाल्यानंतर सुखात्मे यांनी विविध देशांना नेमून दिलेले कार्यक्रम फलद्रूप झाले. अशा या थोर संख्याशास्त्रज्ञाचे २८ जानेवारी १९७७ रोजी निधन झाले.

First Published on: July 27, 2022 1:00 AM
Exit mobile version