सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर

लुई पाश्चर यांचा आज स्मृतिदिन. लुई पाश्चर हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ रोजी फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात झाला. चित्र काढण्यात आणि मासे पकडण्यात रमणार्‍या छोट्या लुईचे अभ्यासात फारसे लक्ष नव्हते. त्याने किशोरवयात रंगीत पेन्सिलींनी काढलेली चित्रे पाश्चर संग्रहालयात ठेवलेली आहेत. त्यांचे सुरुवातीचे संशोधन रसायनशास्त्राशी निगडित होते. टार्टारिक आम्लाच्या रेणूच्या रचनेचा त्यांनी अभ्यास केला.

नैसर्गिक पदार्थांमध्ये असणार्‍या आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या टार्टारिक आम्लाच्या रेणूंच्या रचनेत काही फरक आढळून आला होता. नैसर्गिक पदार्थांमधील टार्टारिक आम्लाचा रेणू ध्रुवीकृत प्रकाशाची दिशा बदलतो, तर कृत्रिमरित्या तयार केलेला रेणू मात्र हे परिवर्तन घडवून आणू शकत नव्हता. त्यांचे बाकीचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म मात्र अगदीसारखेच होते. या रहस्यांचा उलगडा करताना त्यांनी नैसर्गिक टार्टारिक आम्लाच्या रेणूची स्फटिक रचना कृत्रिम टार्टारिक आम्लाच्या स्फटिक रचनेपेक्षा वेगळी असून त्यातील प्रमाणबद्धतेसाठी आवश्यक असलेल्या कार्बनच्या अणुमुळे या अणूची आरशातील प्रतिमा आणि त्या रेणूची रचना यांचे परस्परांवर अध्यारोपण होऊ शकत नाही. असे रेणू प्रकाशीय प्रतिसाद देतात आणि ध्रुवीकृत प्रकाश फिरवू शकतात. रेणूंच्या बहुरूपतेविषयी प्रथमच इतके सुस्पष्ट विवेचन पहिल्यांदाच दिले गेले होते.

त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. जीवाची उत्पत्ती निर्जीव पदार्थांपासून होते, असा समज त्या काळात प्रचलित होता. तत्कालीन समाजातील अनेक मान्यवर या समजाचे खंदे पुरस्कर्ते होते, परंतु लुई यांनी आपल्या प्रयोगांनी या समजामागील शास्त्रीय फोलपणा स्पष्ट केला आणि जीवाची उत्पत्ती जीवापासूनच होते हे सिद्ध करून दाखविले. त्यांचे आणखी एक महत्त्वाचे संशोधन समस्त मानव जातीसाठी वरदान ठरले आहे. रेबीज आणि अँथ्रॅक्स या दोन रोगांवर त्यांनी प्रतिबंधक लसींची निर्मिती यशस्वीपणे केली. अशा या थोर शास्त्रज्ञाचे २८ सप्टेंबर १८९५ रोजी निधन झाले.

First Published on: September 28, 2022 3:00 AM
Exit mobile version