क्रांतिकारी समाजसुधारक डॉ. अ‍ॅनी बेझंट

क्रांतिकारी समाजसुधारक डॉ. अ‍ॅनी बेझंट

डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचा आज स्मृतिदिन. त्या विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इत्यादी क्षेत्रात महान कार्य केलेल्या समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १८४७ लंडनमध्ये झाला. त्यांची आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. अ‍ॅनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले.

नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावीत होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३-९१) यांच्या ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले.

१८८५ मध्ये त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सानिध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणार्‍या ७०० मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. नोव्हेंबर १८९३ मध्ये त्या भारतात आल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली. गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले (१९०५). त्यांच्या ग्रंथांची संख्या सुमारे ४५० आहे. अशा या थोर समाजसेविकेचे २० सप्टेंबर १९३३ रोजी निधन झाले.

First Published on: September 20, 2022 2:00 AM
Exit mobile version