लेखक, शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे

लेखक, शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे

विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचा आज स्मृतिदिन. विठ्ठल घाटे हे मराठी लेखक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८९५ रोजी अहमदनगरमधील घोसपुरी या गावी झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरला व माध्यमिक, तसेच उच्च शिक्षण इंदूर येथे झाले. मुंबई व लंडन येथील शिक्षणशास्त्राच्या पदव्या त्यांनी मिळविल्या. मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्यात विविध अधिकारपदांवर नोकरी करून शेवटी डेप्युटी डिरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन या पदावरून निवृत्त झाले (१९५०). त्यांनी शालेय पुस्तके, शैक्षणिक ग्रंथ, कविता, व्यक्तिचित्रे, ललित निबंध, आत्मवृत्त, नाटक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.

शिक्षण आणि व्यवसाय यांच्या निमित्ताने महाराष्ट्र, माळवा, गुजरात, कर्नाटक अशा विविध प्रदेशांत तसेच परदेशातही वास्तव्य घडल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहुरंगीपणा आला. त्यांच्या जीवनविषयक व्यापक आणि समृद्ध जाणिवांचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. ‘रविकिरण मंडळा’चे ते सदस्य होते. प्रथम ‘मधुकर’ या टोपणनावाने ते कविता करीत. ‘मधु-माधव’ (१९२४) या संग्रहात माधव ज्युलिअन यांच्याबरोबर त्यांच्याही कविता संग्रहीत झालेल्या आहेत. ‘नाट्यरूप महाराष्ट्र’ (१९२६), ‘नाना देशांतील नाना लोक’ (१९३३) ही शालेय पुस्तके.

‘काही म्हातारे व एक म्हातारी’ (१९३९), ‘पांढरे केस’, ‘हिरवी मने’ (१९५९) हे व्यक्तिचित्रांचे संग्रह. ‘मनोगते’ (१९६६), ‘विचारविलसिते’ (१९७३) हे ललित-वैचारिक निबंधाचे संग्रह. ‘दिवस असे होते’ (१९६१) हे आत्मचरित्र, ही त्यांची ग्रंथसंपदा विशेष उल्लेखनीय आहे. १९५३ साली अहमदाबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला होता. अशा या ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञाचे ३ मे १९७८ रोजी निधन झाले.

First Published on: May 3, 2023 4:00 AM
Exit mobile version