मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे

मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे

अण्णासाहेब बाबाजी लठ्ठे हे कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १८७८ रोजी कुरुंदवाड येथे झाला. अण्णासाहेबांचे चौथीपर्यंतचे शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. १८९६ मध्ये ते सांगली हायस्कूलमधून मॅट्रिक पास झाले. त्यानंतर राजाराम कॉलेज, कोल्हापूर व डेक्कन कॉलेज, पुणे येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतील एम. ए. (१९०५) व पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल. एल. बी. ही पदवी (१९१६) त्यांनी प्राप्त केली. ते छत्रपती शाहूंच्या वसतिगृह चळवळीमुळे कोल्हापूरकडे आकर्षित झाले. १८९९ ला स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ‘क्विन व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ व ‘दिगंबर जैन बोर्डिंग’ यांच्या स्थापनेत त्यांनी शाहूंना मदत केली.

जैन समाजातील धार्मिक रूढी, परंपरा व वाईट चालीरीतींना विरोध करून महिला परिषद, स्त्रीशिक्षण विभाग आणि जैन श्राविकाश्रम यांच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शाहूंची वसतिगृह चळवळ जैन वसतिगृहांच्या माध्यमांतून महाराष्ट्र व कर्नाटकात पसरवली. कोल्हापूर संस्थानात अ‍ॅक्टींग सिटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी काम केले. १९०८ ला दलितांच्या शिक्षणप्रसारासाठी ‘मिस क्लार्क होस्टेल’ ची स्थापना झाली, त्यावेळी ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ डिस्प्रेड क्लास’ या दलितांसाठी काम करणार्‍या संस्थेची स्थापना केली.

शिक्षणाधिकारी असताना (१९११-१४) परंपरागत शिक्षकपद्धतीद्वारे शिक्षकांना वतने देऊन त्यांच्यावर बहुजन समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवली. अशिक्षित पाटलांना गावच्या कारभारासाठी शहाणे करण्यासाठी ‘पाटलांची शाळा’ हा अभिनव प्रयोग सुरू केला (१९११). वैदिक शाळा, शेतकी शाळा, वसतिगृह चळवळ, मुलामुलींना शिष्यवृत्ती व फीमाफी, शाळातपासणी पद्धती या त्यांनी सुरू केलेल्या योजना आहेत. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात व ठिकठिकाणी सत्यशोधकीय परिषदा भरविण्यात त्यांचा पुढाकार होता. अशा या थोर समाजसुधारकाचे १६ मे १९५० रोजी निधन झाले.

First Published on: December 9, 2022 4:23 AM
Exit mobile version