स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद

स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद

गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद हे मराठी कवी होते. अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविंद. त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १८७४ रोजी नाशिक या ठिकाणी झाला. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. आरंभी ते लावण्या लिहीत. ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद ।’ ही लावणी म्हणजे त्यांची पहिली उपलब्ध कविता.

तथापि १९०० मध्ये नाशिकमधील ‘मित्रमेळा’ या तरुण क्रांतिकारकांच्या संघटनेशी आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्यकांक्षेची दिशा गवसली. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, रामदास स्वामी यांसारख्या ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर त्यांनी लिहिलेल्या कविता तसेच ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव’, ‘भारतप्रशस्ति’ यांसारख्या कविता याच्या द्योतक आहेत.

देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. ‘मुरली’ ,‘वेदान्ताचा पराक्रम’, ‘गोविंदाचे करुणगान’ यांसारख्या कवितांमधून त्यांची अध्यात्मपरता प्रत्ययास येते. ‘टिळकांची भूपाळी’ आणि ‘सुंदर मी होणार’ या त्यांच्या कविता विशेष गाजल्या. ‘सुंदर मी होणार’ या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितेत ‘नव्या तनूचे आणि नव्या शक्तीचे’ पंख देणार्‍या मृत्यूचे स्वागत केलेले आहे. अशा या प्रतिभाशाली कवीचे २८ फेब्रुवारी १९२६ मध्ये निधन झाले.

First Published on: February 9, 2023 4:00 AM
Exit mobile version