भारतातील पहिली प्रवासी रेल्वे

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे

भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून धावली ती १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना १८३२ मध्ये मांडण्यात आली. भारतात पहिली रुळावरील रेल्वे २२ डिसेंबर १८५१ रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. रेल्वेसदृश्य वाहतुकीचे पहिले पुरावे जुन्या ग्रीसमध्ये सापडतात. नॅरोगेज रेल्वे युरोपातील कोळसा खाणींमध्ये सोळाव्या शतकात वापरात होत्या. त्यांचे रुळ लाकडी असायचे. युरोपात प्रवासी रेल्वे रुळावर आली ती १८३० मध्ये. ती रेल्वे वाफेच्या इंजिनावर पळत असे.

इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला होता. जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमधील मँचेस्टर ते लिव्हरपूल दरम्यान धावली. रेल्वेसाठी वापरण्यात आलेल्या रुळांमधील अंतर नंतर जगभर मापदंड म्हणून वापरले गेले आहे. नंतर १४ वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी, असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेठ यांनी त्यांच्या मालकीची जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.

गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी १८४४ मध्ये परवानगी दिली. त्यानुसार दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोर्‍यांचा हा ‘चाक्या म्हसोबा’ हिंदुस्थानातील पहिल्या-वहिल्या रेल्वे प्रवासाला बोरिबंदर स्थानकातून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी निघाला तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहीब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे ३४ किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने १ तास १२ मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले. या गाडीमध्ये अंदाजे ४०० लोक प्रवास करत होते. तसेच या गाडीत २५ व्हीआयपी प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वत:ही होते.

First Published on: April 16, 2024 4:15 AM
Exit mobile version