जालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग हत्याकांड

१३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. ज्यांच्यावर तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता ते सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीसाठी १० एप्रिल १९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे निघाला होता. या घोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार्‍या इमारतींना आगी लावण्यात आल्या.

टाऊन हॉल, दोन बँकांच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम वगैरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. योगायोग असा की १३ एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण ‘बैसाखी’ही होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख जनता सण साजरा करण्यास एकत्र जमले. त्यासाठी मोठा जनसमुदाय जालियानवाला बागेत जमला होता, पण मार्शल लॉमुळे जमावबंदी लागू होती.

पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. १३ एप्रिल या दिवशी जनरल रेजिनाल्ड डायरने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकूमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला.

First Published on: April 13, 2023 4:00 AM
Exit mobile version