इतिहासाचे भाष्यकार सेतुमाधव पगडी

इतिहासाचे भाष्यकार सेतुमाधव पगडी

सेतुमाधव पगडी हे इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी हैदराबाद राज्यातील निलंगा येथे जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण गुलबर्गा, उस्मानाबाद आणि पुणे येथे झाले. त्यांनी १९३० मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून कला पदवी आणि तीन वर्षांनंतर अलाहाबाद विद्यापीठातून कला पदवी प्राप्त केली.

इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच त्यांनी विपुल प्रमाणात स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा अभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे ग्रंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंद प्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले.

ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेड पर्सन’ या शब्दात त्यांची प्रशंसा केली. मराठवाडा साहित्य परिषद, इंदूर साहित्य सभा, मराठी वाङ्मय परिषद आदी संंस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. हैदराबाद येथील तेलंगण राज्य मराठी साहित्य परिषदेने ‘समग्र सेतुमाधव पगडी’ हा ग्रंथ संच प्रसिद्ध केला. या ग्रंथ संचात सेतुमाधव पगडी यांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे ५ खंड, तसेच इंग्रजी लेखनाचे २ खंड आहेत. मराठी संचाची दुसरी आवृत्ती मे २०१७ मध्ये काढण्यात आली. तसेच सुमारे पाच हजार पृष्ठांचा फारसी भाषेतील मजकूर त्यांनी मराठी भाषेत अनुवादित केला. अशा या थोर लेखकाचे १४ ऑक्टोबर १९९४ रोजी निधन झाले.

First Published on: August 27, 2022 5:30 AM
Exit mobile version