आधुनिक भास्कराचार्य केरुनाना छत्रे

आधुनिक भास्कराचार्य केरुनाना छत्रे

विनायक लक्ष्मण उर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा आज स्मृतिदिन. केरुनाना छत्रे हे आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य होते. त्यांचा जन्म १६ मे १८२५ रोजी अलिबागमधील नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढे जी गती प्राप्त झाली, त्याच्या जोरावर त्यांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन केले. मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली.

अवघ्या १५ व्या वर्षी दर महा ५० रुपये पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्षे जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, पुढे ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असे लक्षात आले की, परंपरागत पंचांगात केलेले अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळे ऋतुकाल तसेच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती. केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. अशा या थोर आधुनिक भास्कराचार्यांचे १९ मार्च १८८४ रोजी निधन झाले.

First Published on: March 19, 2024 4:00 AM
Exit mobile version