संगीतप्रसारक पंडित विष्णू भातखंडे

संगीतप्रसारक पंडित विष्णू भातखंडे

पंडित विष्णू नारायण भातखंडे हे एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक होते. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी वाळकेश्वर, मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील नागाव (जि. रायगड). त्यांचे वडील मुंबईतील एका धनिकाच्या जमीनजुमल्याचे कारभारी होते. त्यांना संगीताची आवड होती. ते स्वरमंडलही वाजवत असत. त्यामुळे विष्णू यांना लहानपणापासून संगीताची गोडी लागली. ते लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले.

ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल. एल. बी. झाले, मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. या संस्थेत त्यांनी कितीतरी वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपरिक धृपदे, ख्याल, होर्‍या, तराणे, ठुमर्‍या यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली.

आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रंमती केली. ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. संगीतावरचे दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्वविचारांची चिकित्सा केली. महत्त्वाची हस्तलिखिते नकलून काढली. हिंदुस्तानी संगीतातील स्वरलिपिरचना, रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार, थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इत्यादी विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली. अशा या महान संगीतप्रसारकाचे १९ सप्टेंबर १९३६ रोजी निधन झाले.

First Published on: August 10, 2022 2:02 AM
Exit mobile version