आधुनिक कवी, नाटककार रामकुमार वर्मा

आधुनिक कवी, नाटककार रामकुमार वर्मा

रामकुमार वर्मा हे आधुनिक हिंदी कवी, नाटककार व समीक्षक होते. आधुनिक हिंदी साहित्यामध्ये एकांकिका सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०५ रोजी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे वडील लक्ष्मीप्रसाद डेप्युटी कलेक्टर व आई राजरानी देवी कवयित्री होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण एक-दोन वर्षे मराठीतून झाले. नंतर त्यांनी ‘रॉबर्ट्सन कॉलेज’, जबलपूर येथे शिक्षण घेतले व त्यानंतर इलाहाबाद विद्यापीठातून हिंदी विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने एम.ए. झाले.

त्यांच्या हिंदी साहित्यिका आलोचनात्मक इतिहास या प्रबंधाला नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. इलाहाबाद विद्यापीठात प्रारंभी प्राध्यापक व पुढे हिंदी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले व अखेर त्याच पदावर सेवानिवृत्त झाले. हिंदी साहित्य संमेलनाचे परीक्षा-मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. रशियन सरकारच्या निमंत्रणावरून मॉस्को विद्यापीठात त्यांनी एक वर्ष हिंदीचे अध्यापन केले.

त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा त्यांचे कवी व वैद्य असलेले आजोबा छत्रसाल, रसिक वडील, संगीताची जाणकार व कवयित्री आई, तसेच शिक्षक विश्वंभरप्रसाद गौतम ‘विशारद’ यांच्याकडून मिळाली. त्यांचे ‘वीर हमीर’ (१९२२), ‘चित्तौड की चिंता’ (१९२९), ‘अंजलि’ (१९३०), ‘अभिशाप’ (१९३१), ‘निशीथ’ (१९३५), ‘चित्ररेखा’ (१९३६), ‘जौहर’ (१९४१) इत्यादी काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. ‘हिमहास’ (१९३५) हे गद्यगीत व ‘एकलव्य’ (१९६४) हे खंडकाव्य त्यांनी लिहिले.

‘बादल की मृत्यू’ ही त्यांची पहिली एकांकिका १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. ‘पृथ्वीराजकी आँखे’ (१९३८), ‘रेशमी टाई’ (१९४१), ‘शिवाजी’ (१९४३), ‘सप्त किरण’ (१९४७), ‘चार ऐतिहासिक एकांकीका’ (१९५०), ‘रूपरंग’ (१९५१), ‘कौमुदी महोत्सव’ (१९४९), ‘विजयपर्व’ इत्यादी त्यांचे एकांकी नाटक-संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘साहित्य समालोचना’ (१९२९), ‘कबीरका रहस्यवाद’ (१९३०), हे त्यांचे गाजलेले टीकाग्रंथ होत. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचे ५ ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

First Published on: September 15, 2022 5:22 AM
Exit mobile version