श्रेष्ठ निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

श्रेष्ठ निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज स्मृतिदिन. बालकवी हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव याठिकाणी झाला. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी १० वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत.

निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात.‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणार्‍या बारा-तेरा तरी कविता आहेत.

‘कविबाळे’, ‘पाखरास’, ‘दुबळे तारू’, ‘यमाचे दूत’, ‘निराशा’, ‘पारवा’, ‘शून्य मनाचा घुमट’, ‘काळाचे लेखा, ‘खेड्यातील रात्र’, ‘संशय’, ‘हृदयाची गुंतागुंत’, ‘जिज्ञासू’, ‘बालविहग’ या कविता त्यांपैकीच होत. जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. अशा या श्रेष्ठ निसर्गकवीचे ५ मे १९१८ रोजी निधन झाले.

First Published on: May 5, 2023 4:10 AM
Exit mobile version