कवी, नाटककार, समीक्षक पु. शि. रेगे

कवी, नाटककार, समीक्षक पु. शि. रेगे

पुरुषोत्तम शिवराम रेगे हे श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. व बी.एस्सीपर्यंत. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.एस्सी. ही पदवी मिळविली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.

‘सुहृद चंपा’ आणि ‘रूप कथ्थक’ ही दोन टोपण नावे त्यांनी अनुक्रमे साधना आणि इतर कविता (१९३१) यातील कवितांसाठी तर ‘रूपकथ्थक’ हे टोपण नाव रंगपांचालिक आणि दोन नाटके (१९५८) या पुस्तकासाठी घेतली होती. त्यांचे अन्य साहित्य पु.शि. रेगे या नावानेच प्रसिद्ध झाले. उदा. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह. साधना आणि ‘इतर कविता’ या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर ‘फुलोरा’ (१९३७), ‘हिमसेक’ (१९४३), ‘दोला’ (१९५०), ‘गंधरेखा’ (१९५३), ‘पुष्कळा’ (१९६०), ‘दुसरा पक्षी’ (१९६६) आणि ‘प्रियाळ’ (१९७२) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत. कारण त्यात भारतीय परंपरेतून आलेली स्त्रीविषयक जाणीव आणि या जाणिवेवर झालेले आधुनिकतेचे संस्कार यांचा एक हृद्य मेळ आढळतो.

‘रूपकथ्थक’ (१९५६) व ‘मनवा’ (१९६८) हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर व त्यांचे अल्पाक्षरमणीयत्व जाणवते. यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. ‘सावित्री’ (१९६२), ‘अवलोकिता’ (१९६४), ‘रेणू’ (१९७३) आणि ‘मातृका’ (१९७८) या रेगे यांच्या चारी कादंबर्‍या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत. त्यांतील भावविश्व गूढ, तत्वस्पर्शी, सखोल व समृद्ध आहे. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

First Published on: August 2, 2022 4:30 AM
Exit mobile version