श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी हे श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी होते. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. त्यांचे शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन पहिल्या वर्षापर्यंत (१९१२) झाले. त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांमध्ये काम करणार्‍या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली (१९०९-१०). १९१० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी ‘मित्रप्रीती’ हे पहिले नाटक लिहिले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर संस्कारक्षम वयातच पडला. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उतार्‍याचे आहे (१९०७). काव्यलेखनाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. त्यांनी ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही पहिली कविता लिहिली.

मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. याच मासिकातून १९१३-१५ मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) या नावाने प्रसिद्ध झाले. ‘प्रेमसंन्यास’ (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतर ‘पुण्यप्रभाव’ (१९१७), ‘एकच प्याला’ (१९१९), ‘भावबंधन’ (१९२०) ही नाटके लिहिली. त्यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व आहे. अशा या श्रेष्ठ नाटककाराचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.

First Published on: May 26, 2023 3:00 AM
Exit mobile version