स्त्री हक्क पुरस्कर्त्या रमाबाई रानडे

स्त्री हक्क पुरस्कर्त्या रमाबाई रानडे

रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. त्यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातार्‍यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ठ्या वर्ज्य गोष्ट होती. घरातील आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.

रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. महादेव रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांनी शिकावे याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले. पुण्यात ‘सेवा सदन’ या महिला संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले.

‘सेवा सदन’च्या अनेक शाखा रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झाल्या. अनेक रुग्णसेविका या सेवा सदनच्या माध्यमातून तयार झाल्या. मुलींची प्रशिक्षण केंद्रे, वसतिगृह असे उपक्रम सेवा सदनच्या माध्यमातून त्यावेळेस राबविले गेले. मुलींकरिता पुण्यामध्ये ‘हुजुरपागा’ या शाळेची स्थापना केली. रमाबाईंचा सामाजिक कार्यातील सहभाग पाहून अनेक स्त्रिया सामाजिक कार्यात आल्या. अशा या थोर समाजसेविकेचे २६ एप्रिल १९२४ रोजी निधन झाले.

First Published on: January 25, 2023 1:44 AM
Exit mobile version