थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिकमधील भगूर येथे झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते, पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला.

विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नाशिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला.

क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती.

त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इत्यादी कार्य चालू होते. अशा या थोर क्रांतिकारकाचे १६ मार्च १९४५ रोजी निधन झाले.

First Published on: March 16, 2024 4:15 AM
Exit mobile version