तिसरे छत्रपती राजाराम महाराज

तिसरे छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याचे अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली.

संभाजी महाराजांच्या पाडावाने औरंगजेबाला आनंद झाला असला तरी, राजाराम महाराजांना कैद न झाल्याची गोष्ट त्याला खटकत होती. त्याने दक्षिणेत उतरून आदिलशाही (1686) आणि कुतुबशाहीचा (1687) यांचा पाडाव केला. या प्रसंगानंतर तो विजापूरकडे मोगल सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी निघून गेला. तेथून पुढे औरंगजेबाने ब्रह्मपुरीला येऊन मराठ्यांचे गडकोट घेण्याची मोहीम सुरू केली.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते. मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. तो मराठ्यांनी ताब्यात घेतला. महाराजांनी जिंजीला राजदरबार भरविला. संताजी आणि धनाजी यांची सेनापतीपदी नियुक्ती केली.

शंकराजी नारायण, नेमाजी शिंदे, हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांना बरोबर घेऊन त्यांनी जिंजीवरून राज्यकारभारास सुरुवात केली. पुढे जिंजीला वेढा पडला, तिथून निघून ते विशाळगडावर आले आणि भविष्यातील दिशा ठरवली. अतिशय अवघड परिस्थितीत स्वराज्याची धुरा सांभाळणार्‍या छत्रपती राजाराम महाराज यांचे २ मार्च १७०० रोजी निधन झाले.

First Published on: February 24, 2023 3:00 AM
Exit mobile version