उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा आज स्मृतिदिन. शंतनुराव हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म २८ मे १९०३ रोजी सोलापूमधील किर्लोस्करवाडी येथे झाला. शालेय शिक्षण औंध येथे आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ मध्ये प्राप्त केली. शेती व नोकरी याव्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही त्या काळात धाडसाचे होते. अशा वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामास सुरुवात केली.

शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे, साखर निर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑईल इंजिन्स, इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत-अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या-त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले. त्या काळात मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला (नाट्य, संगीत, चित्रपट) या क्षेत्रांत प्रगती साधली होती, मात्र मूळ मराठी माणसाने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमावले आहे असे उदाहरण अस्तित्वात नव्हते, पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली.

केवळ भरून काढली असे नव्हे, तर त्यांनी उद्योग-विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. तसेच पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते. शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी ‘उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार’ केला. अशा या महान उद्योगमहर्षीचे २४ एप्रिल १९९४ रोजी निधन झाले.

First Published on: April 24, 2024 5:00 AM
Exit mobile version