कामगार चळवळीचे जनक नारायण जोशी

कामगार चळवळीचे जनक नारायण जोशी

नारायण मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. नारायण जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. त्यांचा जन्म ५ जून १८७९ रोजी कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे झाला. त्यांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. समाजसेवेच्या इच्छेने १९०९ मध्ये ते ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९११ मध्ये त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ ही संस्था स्थापन केली.

या संस्थेच्या कार्याशी ते १९५५ पर्यंत निगडित होते. १९११-१३ या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळ पीडितांसाठी सहाय्यनिधी गोळा केला. हळूहळू त्यांनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले आणि तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याण केंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग इत्यादी चालविले. लंडनमधील टॉयन्बी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी दोन मोठी सभागृहे बांधली.

वॉशिंग्टन येथे १९१९ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने १९२२-४८ या काळात जोशींनी सोळा वेळा युरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. अनेक कामगार कल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशींनाच आहे. अशा या महान समाजसेवकाचे ३० मे १९५५ रोजी निधन झाले.

First Published on: May 30, 2023 4:00 AM
Exit mobile version