जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन

दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हांटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.

हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. या मॅरेथॉनच्या अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते.

स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकरांपासून आजपर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत रवींद्रनाथ टागोरांपासून गुलजारसाहेबांपर्यंत. कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथांसारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत. वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहे. असले फुकाचे अहंकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते. म्हणून वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल.

First Published on: April 23, 2024 4:15 AM
Exit mobile version