जागतिक बुद्धिबळ दिन

जागतिक बुद्धिबळ दिन

‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस २० जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचेच प्राथमिक रूप.

बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हा पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखला जातो. बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाफ झालेला दिसतो.

स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय खेळाडू २०१२ सालापर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा ‘बुद्धिबळ ऑलिंपियाड’ दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडरेशन या जगातील महत्वाच्या स्पर्धा भरवतात. बुद्धिबळ खेळणार्‍या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते.

त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि आय.बी.एम. कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान आणि कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले. अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी त्याची सुरुवात प्रथम भारतात झाली असे मानले जाते.

First Published on: July 20, 2023 2:32 AM
Exit mobile version