जागतिक ग्राहक हक्क दिन

जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठी जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला युनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

ग्राहकाला अर्थव्यवस्थेचा राजा असे संबोधले जात असले तरी त्याला मात्र बाजारपेठेत सतत अडवले जाते, नाडले जाते अन् फसवले तर जातेच जाते. आपण खरेदी करत असलेली वस्तू योग्य दर्जाची, योग्य गुणवत्तेची व वाजवी किमतीची असावी, एवढीच त्याची किमान अपेक्षा असते, पण त्याच्या नशिबी मात्र सतत अपेक्षाभंग अन् मनस्तापच!

ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी २६ डिसेंबर १९८६ या दिवसापासून भारत सरकारने ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात आणला, पण केवळ कायदा करून त्यामागील उद्दिष्ट साध्य होत नाही. हा कायदाही त्याला अपवाद नाही. कायदा अस्तित्वात येऊन २५ वर्षे झालीत, पण थांबले का ग्राहकांचे शोषण? थांबली का त्यांची फसवणूक? कायद्याचा धाक, दरारा निर्माण व्हायला हवा असेल.

तर तो ज्या घटकांसाठी केलेला आहे, तो घटक आधी जागृत असायला हवा. कायद्याचे शस्त्र त्याला पेलता आले पाहिजे. अन्यथा निरक्षरांपुढे शेकडो उत्तमोत्तम ग्रंथ ठेवण्यासारखाच तो प्रकार होईल. भारतासारख्या विकसनशील देशात खर्‍या अर्थाने ग्राहक संरक्षण व्हायचे असेल तर ग्राहक प्रशिक्षण, ग्राहक प्रबोधन व ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक आहे.

First Published on: March 15, 2024 4:15 AM
Exit mobile version