महाराष्ट्रात खेकड्यांचा सुकाळ!

महाराष्ट्रात खेकड्यांचा सुकाळ!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप करताना दोर्‍याला बांधून लटकवलेला खेकडा दाखवला. राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा तसेच अँब्युलन्स खरेदीत ५३९ कोटींचा घोटाळा झाला आहे. खेकडा जसा पोखरतो तसे आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसे पाहता तानाजी सावंत यांनी कोकणातील तिवरे धरण फोडण्याला खुद्द खेकड्यांना जबाबदार ठरवले होते, त्यानंतर तानाजी सावंत आणि खेकड्यांविषयी त्यांनी केलेले हे संशोधन याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. खेकडे खरंच धरण फोडू शकतात का, याविषयी बरीच चर्चा रंगली होती.

कारण आजवर खेकड्यांवर धरण फोडल्याचा आरोप कुणी केला नव्हता. अजित पवार यांनी काकांच्या विरोधात बंड पुकारून भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात घेतल्यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे नव्या दमाचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे येत आहेत. ते अजित पवार यांच्यापेक्षा वयाने आणि राजकीय अनुभवाने बरेच लहान आहेत, पण त्यांच्यामध्ये नेतेपणाची चमक आहे, ती दिसून येत आहे. आज आजोबांच्या पडत्या काळात आणि वयात ते आजोबांच्या बाजूने पाय रोवून उभे राहिले आहेत आणि विरोधकांना तोडीसतोड उत्तरे देत आहेत. कठीण काळात नेत्यामधील चुणूक दिसून येते, रोहित पवार यांच्याबाबतीत तेच दिसून येत आहे. खरे तर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात जागा निर्माण करण्यासाठी अजित पवार यांना बरेचदा बाजूला सारले असे मानले तर आज सुप्रिया सुळे चित्रात दिसत नाहीत, इथे अजित पवार विरुद्ध रोहित पवार असेच चित्र दिसत आहे. म्हणजे पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असाच खेळ सुरू झालेला दिसत आहे.

पवार घराण्यात जी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे, त्यात रोहित पवार आपली जागा दमदारपणे बनवत आहेत. त्यांचा आवाज खर्जातला आहे, वक्तृत्व दमदार आहे, विषयाची मांडणी मुद्देसूद आहे, त्यामुळे पवार घराण्यातील नवा नेता म्हणून ते पुढे येत आहेत. आपले बोलणे अधिक वास्तववादी बनवण्यासाठी तानाजी सावंत यांच्या जुन्या वक्तव्याचा धागा पकडून आपल्या पत्रकार परिषदेत धाग्याला बांधलेला खेकडा त्यांनी दाखवला. त्यांना वाटले की, त्यातून तानाजी सावंत यांची आपल्याला चांगलीच फिरकी घेता येईल, पण या प्रकरणाने भलतेच वळण घेतले. त्यात पुन्हा सध्या निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे खेकडा रोहित पवार यांच्या चांगलाच अंगाशी आलेला आहे. प्राणी हक्क संघटना ‘पेटा’ने उपजिल्हा निवडणूक आयोग अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून खेकड्याचा छळ केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

निवडणूक प्रचार करताना महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेनुसार प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसा आदेश मुख्य निवडणूक कार्यालयाने २४ मार्चला काढला आहे. निवडणूक आयोगाची नियमावली आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० यांचे रोहित पवार यांनी उल्लंघन केले आहे, असे पेटा इंडियाने पत्रात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर पशुवैद्यकीय सेवा आणि खेकड्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपल्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पेटाने केली आहे. थोडक्यात काय तर रोहित पवार यांना विरोधकांची खिल्ली उडवण्यासाठी खेकड्याचा वापर करणे किती महागात पडले हे यावरून दिसून येईल. यांच्यावर आता काय कारवाई होते, ते पहावे लागेल.

सध्या भाजपकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता आहे, त्यांनी पवार घराण्याविरोधात कडवा संघर्ष सुरू केलेला आहे, त्यामुळे ते रोहित पवार यांना खेकडा प्रकरणातून काही सहजासहजी सोडतील, असे वाटत नाही. कारण छगन भुजबळांनी सभागृहात भाजपवाले मुंबईला सोन्याची कोंबडी समजतात, असे म्हटले होते. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी भुजबळांनी मुंबईला कोंबडीची उपमा दिली असे म्हणत एकच कहर केला. भुजबळांकडे माफी मागण्याची मागणी केली. भाजप नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहून भुजबळांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यामुळे सध्या शरद पवार गटाविरोधात आक्रमक झालेले आणि त्यांच्याकडून यावेळी काहीही करून लोकसभेचा बारामती मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी आकाश-पाताळ एक करणारे भाजपवाले रोहित पवार यांना खेकडा प्रकरणावरून सहजासहजी सोडतील, असे वाटत नाही.

खेकडा हा प्राणी त्याच्या विशेष प्रवृत्तीबद्दल ओळखला जातो, खेकडे जर एका मोठ्या भांड्यात ठेवले तर त्यावर झाकण ठेवण्याची गरज नसते, कारण एका खेकड्याने त्या भांड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे खेकडे त्याला खाली खेचतात, असे होत असल्यामुळे त्या भांड्यातून कुठलाच खेकडा बाहेर पडू शकत नाही. याला खेकडी प्रवृत्ती म्हटले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ही प्रवृत्ती प्रचंड फोफावल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जी नेत्यांची चढा-ओढ सुरू आहे, ती पाहता प्रत्येकजण खेकड्याच्या भूमिकेत शिरलेला दिसतो.

First Published on: April 8, 2024 3:00 AM
Exit mobile version