काँग्रेसचे मुस्लीम लांगुलचालन!

काँग्रेसचे मुस्लीम लांगुलचालन!

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांना उघडे पाडण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची पोलखोल करताना काँग्रेस हा पक्ष कसा मुस्लीमधार्जिणा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी २००६ सालचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन त्यात या देशाच्या संपत्तीवर अल्पसंख्याक आणि मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे सिंग म्हणत असल्याचे दाखवून दिले. या देशातील राजकारण हे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लीम या दोन ध्रुवांभोवती फिरत आले आहे. इतकेच नव्हे तर ते फिरत ठेवण्यात येते. खरेतर १९४७ साली भारताची फाळणी झाल्यावर हे थांबायला हवे होते. कारण मुस्लिमांसाठी वेगळा पाकिस्तान मिळाला होता. देशाची फाळणी झाल्यानंतर बहुतांश काळ देशावर काँग्रेसची बहुमताची सत्ता होती. त्यामुळे नेहरू आणि गांधी म्हणतील तीच पूर्व दिशा अशीच स्थिती होती. जे मुस्लीम भारतात राहिले ते स्वखुशीने राहिले होते. जे इथे राहिले त्यांनी हिंदुस्थानच्या मुख्य प्रवाहात मिसळून जायला हवे होते. पाकिस्तानी लोक भारताला हिंदुस्थान असेच संबोधतात. हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान या तत्त्वावर या देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे या देशात राहणार्‍या मुस्लिमांनी भारतीय संविधानाच्या अधिन राहून इथले नियम पाळणे आणि स्वत:ची प्रगती करून घेणे अपेक्षित होते.

बहुतांश काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने भारतात राहणार्‍या मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर भर देणे अपेक्षित होते. मुस्लीम मोठ्या संख्येने ज्या मदरशांमध्ये शिकतात त्यांचे आधुनिकीकरण करून तिथे आधुनिक शिक्षण द्यायला हवे होते. तसे व्यापकतेने झाले नाही. कारण आमच्या धार्मिक बाबतीत सरकारने हस्तक्षेप करायचा नाही, अशी जी मुस्लिमांची भूमिका होती त्याला सत्तेत असलेले काँग्रेसचे नेते वचकून होते. त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावणार नाहीत याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. हम सब हिंदू हैं यावरून हम सब हिंदी हैं, यावरून हम सब भारतीय हैं, असा बदल काँग्रेसने घडवला. याला कारण एकच होते की हिंदू, हिंदी हा शब्द मुस्लिमांना आवडत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेसची सत्ता आली तर ते देशाची संपत्ती कशी मुस्लिमांना वाटून टाकतील हे सांगून लोकसभा निवडणुकीत नक्कीच मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारे मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे सिंग हे काही पहिलेच काँग्रेसी पंतप्रधान नाहीत. मोदींसारख्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने असे विधान करणे चुकीचे असले तरी वास्तव लपवता येणार नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीपासून मुस्लीम लांगुलचालनाची भूमिका घेऊन त्यातून त्यांच्या धार्मिक भावना फुलवत ठेवल्या. त्यातून त्यांना समाधान कसे वाटेल हे पाहण्यात आले, पण काँग्रेसने जर मोठ्या प्रमाणात मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी मनापासून प्रयत्न केले असते, तर मोदींना त्यांच्यावर अशी टीका करण्याची संधी मिळालीच नसती.

भारताची फाळणी हीदेखील काँग्रेसच्या मुस्लीम लांगुलचालनामुळेच झाली. जर त्यांनी कठोर भूमिका घेतली असती तर देशाची फाळणी झाली नसती. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना देशाच्या दोन भागात मोठे यादवी युद्ध सुरू होते. देश फाळणीच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष लिंकन यांनी ठाम भूमिका घेऊन या देशाची कुठल्याही परिस्थितीत मी फाळणी होऊ देणार नाही, असे सगळ्यांना बजावले म्हणून तो देश अखंड राहिला. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढला गेला, पण काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लीम नेत्यांसमोर नमती भूमिका घेतली. त्यामुळे या देशाची फाळणी झाली. तलाक दिलेल्या मुस्लीम महिलेला पोटगी मिळवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत फिरवला. फक्त तीन वेळा तलाक म्हटले की मुस्लीम महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते याचा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी केला नाही.

संसदेवरील अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला आणि मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाबला फाशीची शिक्षा झालेली असताना केवळ मुस्लिमांच्या भावना फुलवून त्याचा फायदा मिळवण्यासाठी त्यांना पोसून ठेवण्यात आले. पुढे जेव्हा नरेंद्र मोदी यांना प्रतिसाद वाढत आहे हे लक्षात आल्यावर काँग्रेसने अफजल गुरू आणि कसाबला रातोरात फासावर चढवले. काँग्रेस नेत्यांच्या मुस्लीम भयगंडातूनच कट्टर हिंदुत्ववादाचा जन्म झालेला आहे. काँग्रेस नेत्यांनी मुस्लिमांबद्दल वाटणार्‍या या भीतीलाच पुरोगामीत्वाचा गोंडस मुलामा दिलेला आहे. काँग्रेस नेत्यांनी मुस्लिमांना भुरळ पाडणारी अनेक विधाने केली, पण प्रत्यक्षात त्यांच्या विकासासाठी जे करायला हवे होते ते केले नाही. नाहीतर आज आपल्या देशातील मुस्लीम समाज इतक्या प्रमाणात मागास दिसला नसता. त्यांची मुले चांगले शिक्षण घेऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आली असती. प्रत्येक मुस्लीम हा दहशतवादी नाही, पण जे दहशतवादी पकडले जातात ते बहुतांश मुस्लीम असतात. हा काँग्रेसच्या लांगुलचालन धोरणाचा पराभव आहे. काँग्रेसने आजवर मुस्लिमांना गोंजारून त्यांच्या एकगठ्ठा मतांचा निवडणुकीत फायदा करून घेतला, पण त्या समाजात सुधारणेची प्रक्रिया राबवून त्यांचा फायदा होईल असे पाहिले नाही.

First Published on: April 29, 2024 4:00 AM
Exit mobile version