पंतप्रधानांचे मराठी प्रेम!

पंतप्रधानांचे मराठी प्रेम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दौरे इतर राज्यांशी तुलनात्मक विचार करता जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर आता ते आपल्या भाषणाच्या केवळ सुरुवातीलाच नव्हे तर भाषणामध्येही मराठीतील म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करताना दिसतात. त्यांना इतके मराठी प्रेम का वाटावे. असे असेल तर मग ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मोकळे का होत नाहीत. कारण मराठी माणसांची ती प्रलंबित मागणी आहे. तर मग या मराठी प्रेमामागे काही वेगळे कारण असेल का, हाही एक संशोधनाचा विषय आहे. मोदींना या वेळी चारसौ पार करून राजीव गांधी यांच्या कालावधीतील काँग्रेसचा रेकॉर्ड तोडायचा आहे. मोदींनी मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसमुक्त भारताचा नारा देऊन काँग्रेसला जेरीस आणले आहे. कारण लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून बसायला आवश्यक असतात, तेवढ्याही जागा मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी विविध प्रकारच्या यात्रा काढून देश पिंजून काढत आहेत.

काँग्रेसकडे सध्या केंद्रीय पातळीवर प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे सगळीकडे गटबाजी फोफावलेली दिसत आहे. त्यामुळे तो पक्ष विस्कळीत झालेला आहे. त्याचसोबत काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या भवितव्याची चिंता सतावत असल्यामुळे भाजपचा मार्ग धरल्याचे दिसते. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचे पुत्र आहेत. इतकेच नव्हे तर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखे पारंपरिक काँग्रेसी नेते तर अगोदरच भाजपमय झालेले आहेत. भाजपने केंद्रीय सत्तेचा वापर करून २०१९ साली महाराष्ट्रातील आपली गेलेली सत्ता पुन्हा आणली, पण ती आणण्यासाठी त्यांनी अडीच वर्षे काय केले, ते जनतेने पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचा प्रचंड अपेक्षाभंग झालेला होता. त्यामुळे काहीही करून उद्धव ठाकरे यांना पायउतार करण्याचा भाजपने चंग बांधलेला होता.

कोरोना काळातसुद्धा भाजपने मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोडले नाही. विविध प्रकारे त्यांना कोंडीत कसे पकडता येईल ते पाहिले. कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली होती, त्यावेळी भाजपने त्याचा धार्मिक मुद्दा बनवून मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली. काहीही करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला खाली खेचायचेच असे प्रयत्न सुरू होते. अनेक शिवसेना नेत्यांच्या ईडीच्या माध्यमातून चौकशा सुरू झाल्या. तो काळ असा होता की, जणू काही देशभरातील सगळे भ्रष्टाचारी महाराष्ट्रात आहेत, त्यातही शिवसेनेत आहेत, असे वातावरण निर्माण झाले होते. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात कामाला लावण्यात आले होते. पण अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तसा सगळा तपास अचानक बंद झाला. केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा आपल्या जागी गेल्या. थोडक्यात, काय तर राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार आणण्यासाठी केंद्राची सगळी ताकद महाराष्ट्रात ओतली. कारण ते केवळ राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या बळावर होणे शक्य नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार सहजासहजी पडत नाही, हे पाहिल्यावर भाजपची मुख्य विरोधक असलेली शिवसेना कमजोर कशी होईल, याचा मार्ग शोधण्यात आला. तो त्यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सापडला. सुरुवातीला शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणणारे भाजपवाले, तुमचा पक्ष तुमच्या नाकाखालून पळवला, असे सांगू लागले. त्यामुळे या सगळ्यामागे भाजपच आहे, हे लोकांना कळले. भाजपने राज्यात आपली सत्ता तर आणली, पण केंद्रीय पातळीवरून अचानक निर्णय झाला आणि मुख्यमंत्री होण्यासाठी मुंडवळ्या बांधून उभे असलेल्या देवेंद्र फडवणीस यांना त्या उतरवून एकनाथ शिंदे यांच्या हाती द्याव्या लागल्या होत्या.

भाजपची अवस्था सत्ता आली, पण मुख्यमंत्रीपद गेले, अशी झाली. ज्यांना पाहुणे म्हणून आणले त्यांच्या हाती घराच्या किल्ल्या द्याव्या लागल्या. इतकेच नव्हे तर त्यानंतर अजित पवार हे आणखी एक पाहुणे आपल्या सोबत आणले. या सगळ्यांची मिळून महायुती झालेली आहे. पण या लोकसभा निवडकीत या महायुतीच्या जागावाटपावरून जी काही रस्सीखेच दिसली, त्यावरून या तिन्ही पक्षांचे आतील संबंध किती चांगले आहेत हे दिसून आले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असली तरी यांनी आपले पक्ष भाजपमध्ये विलीन केलेले नाहीत. त्यामुळे भाजपला त्यांना गृहीत धरता येणार नाही. त्यांना त्यांचा वाटा द्यावाच लागणार आहे, तो दिला नाही तर त्याच्या परिणामांना सामोेरे जावे लागले. हीच चिंता पंतप्रधान मोदींना वाटत असावी. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो महाराष्ट्रात जास्त ताकद वापरत असावेत. कारण राज्यात भाजपने महायुतीची सत्ता आणल्यावर कुठल्याच निवडणुका घेतल्या नाहीत, ज्या घेतल्या त्यात परिणाम दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात चांगले निकाल लागायचे असतील तर आपल्यालाच झिजावे लागणार आहे, याची पंतप्रधान मोदींना कल्पना असावी.

First Published on: April 22, 2024 7:18 AM
Exit mobile version