वाढणार्‍या प्रदूषणावर हवा शुद्धिकरण मनोर्‍यांचा उतारा!

वाढणार्‍या प्रदूषणावर हवा शुद्धिकरण मनोर्‍यांचा उतारा!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी दिल्लीचे प्रदूषण कमालीचे वाढले होते. त्यावर मुंबईने मात (!) करीत देशात नव्हे तर चक्क जगात पाकिस्तानातील लाहोरनंतर दुसरा क्रमांक ‘पटकावला’ आहे. ही बाब अर्थातच भूषणावह नाही किंबहुना चिंता वाढविणारी आहे. याच स्तंभात काही दिवसांपूर्वी मुंबईचा विकास नागरिकांच्या मुळावर उठल्याकडे लक्ष वेधले होते. वाढते प्रदूषण आणि त्याच्या भयावहतेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईच्या प्रदूषणाची चर्चा वर्षानुवर्षे होत आली आहे.

पूर्वी कारखान्यांच्या धूर ओकणार्‍या चिमण्या आणि वाहनांतून निघणारा धूर यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची ओरड होत असे. कालौघात मुंबईच्या नशिबात एका मागोमाग एक विकासपुरुष आले आणि ते झपाटल्यागत काम करू लागल्याने ७ बेटांचे शहर असलेल्या मुंबापुरीत चौफेर विकासकामे सुरू झाली. चाळी, गिरण्या मोडीत निघून तेथे गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. मुंबईचे शांघाय करायचे काहींचे स्वप्न असले तरी विकासकामांचा ओघ इतका प्रचंड आहे की शांघाय कधी होईल, हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.

मुंबईतील प्रदूषण किती झपाट्याने वाढतेय हे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘आयक्यू एअर’ ने २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात २९ जानेवारी रोजी मुंबई शहर प्रदूषित शहरांमध्ये १० व्या क्रमांकावर होते, तर ८ फेब्रुवारी रोजी थेट दुसर्‍या क्रमांकावर हे शहर पोहचले. प्रदूषण वाढीचा वेग काळजाचा ठोका चुकविणारा आहे. या प्रदूषणकारी हवेमुळे विविध आजार बळावत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे शहराला वाहनांचा भार सोसवेनासा झाला असताना विकासकामांचा ओव्हरडोसही सहन करण्यापलीकडील आहे. धूळ आणि धूर प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. ई वाहने आणि सीएनजीवर चालणारी वाहने रस्त्यावर आली असली तरी डिझेल, पेट्रोलवर धावणार्‍या वाहनांच्या तुलनेत त्यांची संख्या नगण्य आहे.

धूर ओकणारी वाहने प्रदूषणाला हातभार लावत असताना दुसरीकडे रस्ते, पूल, मेट्रो प्रकल्प, इमारतींचे बांधकाम यामुळे धुळीचे प्रचंड लोट हवेत उठत आहेत. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जाणकारांच्या माहितीनुसार ‘ला निना’च्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वार्‍याचा वेग कमी झालेला असल्याने प्रदूषणाचा आलेख वाढलेला आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव गुदमरून विविध आजारांचा जोर वाढत असल्याने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची गरज आहे. पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना शहरात तात्काळ एअर प्युरिफायर टॉवर उभारण्याचे आदेश दिले असून पालिकेनेही अर्थसंकल्पात त्याकरिता २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वाहनांचा विळखा असणार्‍या ठिकाणी १४ टॉवर उभारण्याचे प्रस्तावित असून प्रत्येक टॉवरला ३ कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

असे टॉवर उभारणे वगैरे ठीक आहे, पण मूळ दुखण्यालाही हात घालावा लागेल. मेट्रोची कामे, रस्त्याची कामे या कारणास्तव वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. अनेकदा ही वाहतूक तासंतास एकाच जागी थांबून राहते. ही कोंडी फोडण्यासाठी पावले उचलावी लागतील. नागरिकांना वेठीला धरून सुरू असलेला विकास कळीचा मुद्दा ठरत आहे. शहराचे रूपडे पालटण्याचा चाललेला अट्टाहास बराचसा राजकीय स्वरुपाचा असतो ही बाब काही लपून राहिलेली नाही.

मुंबईचे कैवारी आपणच या आविर्भावात राजकीय नेते असल्याकारणाने धडाधड विकासकामे सुरू केली जात आहेत. यात जनतेचा किती वेळ वाया जातोय, इंधनाची किती नासाडी होतेय, आरोग्याच्या समस्या कशा निर्माण होतायत याकडे कुणाचे लक्ष नाही. डम्पिंग ग्राऊंडमधून जाळला जाणारा कचरा, आजूबाजूचे कारखाने यातून निर्माण होणारे प्रदूषण हेही मुंबई शहराच्या जिवावर उठले आहे. प्रदूषण ही समस्या गांभीर्याने घेतली जात नसल्याने या मायानगरीची अक्षरशः घुसमट झालेली आहे. शहर आता कोणतेही ओझे पेलण्यापलीकडे गेलेले असताना सुरू असलेली कामे थांबणार कधी याचे उत्तर कुणाकडेही नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे चांगल्यापैकी असताना खासगी वाहनांचा वापर कमी होत नाही. गारेगार प्रवास उपलब्ध झाला तरी अनेकांना स्वत:चे वाहन घेऊन येणेच सोयीचे वाटत आहे. यात कुठेतरी बदल झाला पाहिजे. मुंबईतील बांधकामांना कधीच पूर्णविराम मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. परिणामी धुराबरोबर धुरळ्याचाही त्रास सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.

मुंबईप्रमाणे अन्य शहरांतही हीच परिस्थिती आहे. तेथेही मुंबईसारखीच घुसमट होत आहे. बांधकामांचे पेव फुटलेले असताना छोटी-मोठी नवी वाहने रस्त्यावर येण्याचा सिलसिला सुरू आहे. तेथे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या शहरांप्रमाणे इतरत्रही रस्ते, इमारत बांधकामे, कारखाने, वाढती वाहने यामुळे धडपणे मोकळा श्वास घेता येत नाही. महाराष्ट्रात अशी कितीतरी औद्योगिक क्षेत्र आहेत की आजूबाजूच्या परिसराला प्रदूषणाने आपल्या घट्ट विळख्यात घेतलेले आहे. यावर ओरड झाली तरी काही उपयोग होत नाही. कधी काळी स्वच्छ आणि सुंदर हवेची असलेली ठिकाणे प्रदूषणाचा अनुभव घेत आहेत. कोकणात याचा प्रत्यय अधिक येत आहे. काही कारखाने असे आहेत की ते कायम धुक्यात वेढल्यासारखे दिसतात. या धुक्यामुळे अनेकदा फसगत होते.

पहाटे धुके पसरलेय म्हणून त्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक बाहेर पडतात तेव्हा खोकला, घशाला खवखव सुरू झाली की धुक्याचं खरं स्वरुप स्पष्ट होतं. अशी फसगत मुंबईत ट्रॉम्बे परिसरात कित्येकवेळा झाली आहे. तो अनुभव काही ठिकाणी प्रदूषणकारी कारखान्यांमुळे येत आहे. धुरातून येणारे विषारी घटक अनेक घातक रोगांना कारणीभूत ठरत असल्याचेही वारंवार समोर येत आहे. यावर उगारण्यात येणारा कारवाईचा बडगा म्हणजे एकाने मारायचे नाटक करायचे आणि दुसर्‍याने रडायचे नाटक करायचे, अशा पठडीतील आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर अशी काही गावे दाखविता येतील की तेथील जनतेने कारखान्यांचे प्रदूषण निमूटपणे मान्य करून घेतले आहे. प्रदूषणामुळे गरीब बिचार्‍या चिमण्यांचा चिवचिवाटही संपल्यात जमा आहे.

कारखान्यांतून रात्रीच्या वेळी घातक वायू हवेत सोडण्यात येतो. यावर तक्रारी झाल्या. थातूरमातूर कारवाई करून प्रकरण मिटविले जाते. या प्रदूषणामुळे सुपीक शेतीचेही मातेरे झालेले आहे. प्रदूषणाची तक्रार करणार्‍याला मुर्खात काढले जाते. स्वाभाविक अशा तक्रारी करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. कारखान्यांमुळे नदी, नाले प्रदूषित झाले तरी त्याचे कुणाला सोयरसुतक नाही. या प्रदूषणात मासे घुसमटून मरत आहेत. काही ठिकाणचे प्रदूषित पाणी तर झाडांनाही वापरण्यालायक राहिलेले नाही. प्रदूषणाचा विळखा अशा विचित्र पद्धतीने पडतोय की एकातून सुटले की दुसर्‍या विळख्यात अडकायला होते. पूर्वी मुंबईतून प्रवास करताना शहराबाहेर पडले की हायसे वाटायचे. आता तसे राहिलेले नाही. एकतर कारखान्यांचा धूर, वाहनांचा धूर किंवा नादुरुस्त रस्त्यावरील धूळ आदी सारे पाचवीला पूजल्यासारखे झाले आहे.

काही जाणकार सांगतात की, धुरळ्याचा किंवा धुराचा त्रास कधी अनुभवला नव्हता इतका तो जाणवतोय. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही प्रदूषित हवेमुळे वाढलेल्या आजारांची संख्या लक्षणीय असल्याचे मान्य करतात. सर्दी, खोकला यासारखे आजार तर हटण्याचे नाव घेत नाहीत आणि त्यामागे केवळ प्रदूषित हवेचे कारण आहे. श्वसनाचे आजार बळावलेल्यांची संख्या मोठी आहे. एकामागोमाग एक आजार उद्भवतायत असे सांगणारे जागोजागी भेटतात. हवेप्रमाणे जल प्रदूषणही चिंतेत भर टाकणारे आहे. काही कारखाने रसायनमिश्रित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता बिनदिक्कतपणे ते नदी, नाल्यातून सोडत आहेत. याचा परिणाम मासे मरण्यावर तरी होतो किंवा त्यांना उग्र दर्प येण्यात होतो. कोकणातील कितीतरी ठिकाणी पारंपरिक मासेमारी प्रदूषित पाण्यामुळे अशक्य होऊन बसली आहे.

प्रदूषण नेमके कशामुळे होत असते हे काही लपून राहिलेले नाही. मग ते मुंबईसारख्या शहरातील असो, अन्य शहरातील असो किंवा औद्योगिक क्षेत्रांच्या आसपासच्या गावांतील असो, प्रत्येक ठिकाणी दुर्लक्ष झालेले आहे. यापूर्वी पर्यावरणवादी वारंवार यावर आवाज उठवत असत. कारवाईच्या नावाने सारीच बोंब असल्यामुळे त्यांचाही आवाज आता क्षीण होत चालला आहे. विकासाच्या नावाखाली खुलेआम वृक्षतोड झाली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी शेकडो वर्षे जुनी महाकाय झाडे एका झटक्यात भुईसपाट करण्यात आली आहेत. त्याजागी शोभेची झाडे लावण्याचा सपाटा सुरू आहे. यावर आवाज उठवला जात नाही.

रस्ते बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान आले असल्याने काही ठिकाणी झाडे वाचविणे शक्य असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात भाजी कापावी तशी वृक्षांची कत्तल होत आहे. भावी पिढीला आपण प्रदूषणकारी वातावरणात वाढवित आहोत याची जाणीव कुणाला नाही. प्रदूषण रोखण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. हवा, जल प्रदूषणाबरोबर अन्न प्रदूषणही होत आहे. त्यात कमतरता म्हणून की काय नियमांचे तीन तेरा वाजवून लावण्यात येणार्‍या वीटभट्ट्यांतून निघणारा धूर डोकेदुखी ठरत आहे. प्रदूषणाबाबत सरकार गंभीर असल्याचे जाणवत नसल्याचा आरोप अलीकडे वारंवार होत आहे. मुंबईसह सर्वत्र वाढते प्रदूषण धोक्याची घंटा वाजवत आहे.

First Published on: March 10, 2023 9:35 PM
Exit mobile version