राष्ट्रउभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक योगदान!

राष्ट्रउभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक योगदान!

-प्रदीप जाधव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत समाज, राष्ट्र आणि मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी रक्ताचं पाणी करणारे महापुरुष. २४ तासांपैकी १८ तास अभ्यास, समाजचिंतन आणि काम करणारे जगातील एक प्रकांड पंडित, ज्यांना जगभरात ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असं संबोधलं जातं. बुद्धानंतर माणसांच्या स्वातंत्र्यासाठी मानवमुक्तीचा लढा उभारणारे महामानव. राष्ट्रउभारणीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी झटणारे राष्ट्रनिर्माते. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र अशा सर्वच विषयांवर प्रभुत्व असलेले विद्वान.

जगातील राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून संविधानाच्या निर्मितीतून संसदीय लोकशाही शासनप्रणालीनुसार भारत एकसंध म्हणून टिकून आहे अशा भारतीय संविधानाचे शिल्पकार. समतेची चळवळ कुणा एका गटाच्या जाती सापेक्षतेची नसून संपूर्ण समाजाची आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आग्रह होता. त्यांच्या संघर्षाने एका जागरणपर्वाची निर्मिती केली त्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक. दुसर्‍या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडला ब्रिटिशांच्या देशात त्यांच्याच मायभूमीत जाऊन बाबासाहेबांनी गांधीजींच्या समक्ष ठणकावून सांगितले, ‘मी भीमराव रामजी आंबेडकर प्रथम भारतीय आणि अंतिम अंतिमतः भारतीयच.’ इतके प्रखर देशभक्त, राष्ट्रप्रेमी.

आयुष्यभर जातीयतेचे चटके भोगले तरी उभ्या आयुष्यात केवळ एका जात समूहाचा विचार न करता संपूर्ण मानवी कल्याणाचा विचार मांडून विषमतेविरुद्ध जातीअंताचा लढा पुकारणारे समतेचे पुरस्कर्ते. मिळालेल्या आयुष्यात कधीही कुटुंबाचा विचार न करता केवळ समाज आणि राष्ट्रउभारणीच्याच कामात व्यग्र असताना स्वत:ची अपत्य गेली तरी दुःख न करता केवळ समाजासाठी, मायभूमीसाठी अश्रू ढाळणारे महान देशप्रेमी. म्हणूनच कोट्यवधी लोकांच्या जगण्याची प्रेरणा, ऊर्जा आणि श्वाससुद्धा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जगभरातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सर्वच प्रकारचं साहित्य लिहिलं असून तो एक जागतिक विक्रमच आहे.

विद्वत्तेच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न सांडता समाजक्रांती करणारे थोर क्रांतिकारक म्हणून जगभरात त्यांचा सन्मान होत आहे. बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम, देशभक्ती आजच्या परिस्थितीत अत्यंत प्रेरणादारी ठरते. कारण राष्ट्राप्रति निस्सीम त्याग आताच्या पिढीमध्ये उरलेला दिसत नाही. इथल्या राष्ट्रीय संपत्तीचा उपभोग घेऊन भारतात शिक्षण घ्यायचं, परदेशात जाऊन मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी आपल्या ज्ञानाचा फायदा परकियांना द्यायचा याला राष्ट्रप्रेम म्हणायचं का? राष्ट्रवादाचा खोटा बुरखा पांघरणारे आताचे ढोंगी देशभक्त, राजकारणी यांनी मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून स्वत:साठी शंभर पिढ्यांची सोय केली आहे.

त्यांनी प्रथम देशाच्या विकासासाठी देशप्रेम काय असतं हे बाबासाहेबांकडून शिकून घ्यावं. बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. गौतम बेंगाळे यांनी ‘राष्ट्रप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकातून बाबासाहेबांच्या राष्ट्रप्रेमाविषयी सखोल माहिती दिली आहे. डॉ. गौतम बेंगाळे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नामांतर लढ्यातील मुख्य आंदोलक.

डॉ. आंबेडकर म्हणत असत, आपल्या भारत देशापेक्षा कोणीही मोठा नाही. भाषिक, वांशिक, धार्मिक अहंकारापासून राष्ट्राला वाचवण्यासाठी प्रचलित असलेली व्यक्तीपूजा, कर्मकांड बंद झाल्याशिवाय देशवाद निकोप होणार नाही. व्यक्तीपूजेपेक्षा व्यक्तीचिकित्सेवर त्यांचा अधिक भर होता. डॉ. आंबेडकरांचा देशवाद विवेकशील, मानवतावादी स्वभावाचा होता.

जुन्या घटकांऐवजी मानवनिष्ठेला महत्त्व देणारा, सर्वांचे कल्याण करणारा असा उदात्त देशवाद त्यांनी मांडला. आजच्या सांस्कृतिक अराजकतेच्या काळामध्ये त्यांचे विचार तितकेच मार्गदर्शक आहेत. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी लंडन येथे गोलमेज परिषदा भरवल्या. त्यातील पहिली गोलमेज परिषद १९३० साली झाली. पहिल्या गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांनाही बोलावण्यात आले होते.

या परिषदेमध्ये अनेक पुढारी व विद्वान यांच्याबरोबर चर्चा झाली. डॉ. बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या पंतप्रधानांना स्पष्टपणे सांगितले की, आमचे आपसातील मतभेदाचे आम्ही बघू, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, इथे मी संपूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. भारतीयांना जबाबदार शासनपद्धती देण्याची तयारी नसेल तर इंग्रजांनी भारत देश सोडून निघून जावे. इंग्रजांना त्यांच्याच भूमीत जाऊन सुनावणारे डॉ. बाबासाहेब एकमेव प्रतिनिधी होते.

कष्टकरी व शेतमजुरांचे मार्गदर्शक या लेखात संदर्भ देताना डॉ. बेंगाळे लिहितात, हिराकूड धरणाची पायाभरणी झाल्यानंतर काही महिन्यांनी या धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी बाबासाहेब निघाले. धरणाच्या स्थळापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता अत्यंत प्रतिकूल असल्याने ते आपल्या खात्याच्या सचिवांसोबत पायीच धरणस्थळी गेले.

तिथे गेल्यावर पाहणी आटोपल्यानंतर ते त्या मजुरांसोबत बसले. त्यांच्या ख्यालीखुशालीची चर्चा केली. त्यांच्याशी बोलताना बाबासाहेब म्हणाले, तुम्ही केवळ एखादे धरण बांधत नाहीत, तर तुम्ही देश उभा करीत आहात. तुम्ही एकप्रकारे या देशाच्या उभारणीचे शिल्पकार आहात. शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्याचं कौतुक करणारे केवळ बाबासाहेबच. श्रमिक, कष्टकर्‍यांचा कळवळा त्यांना होता.

हिंदू कोड बिलाची निर्मिती बाबासाहेबांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचं काम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेत तयार करून मांडले. पास करून घेण्यासाठी आग्रहाची भूमिका मांडली. भारतीय महिलांचे उद्धारक, कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच हे हिंदू कोड बिलावरून स्पष्ट होते. रमाईंना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी ‘स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे,’ असे म्हटले. ते सर्वार्थाने खरे आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा असा वीर योद्धा पुन्हा होणे नाही. हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांचे एक प्रकारे सुरक्षा कवच होते.

डॉ. आंबेडकरांचे भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये योगदान या लेखात डॉ. गौतम बेंगाळे यांनी अनेक संशोधनीय संदर्भ दिले आहेत. त्यात ते लिहितात, भारत देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू परराष्ट्रातल्या अनेक विद्वानांना आपल्या देशात बोलावून त्यांच्याकडून भारताची राज्यघटना लिहून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका इत्यादी राष्ट्रांतील कायदेतज्ज्ञांशी संपर्क साधला होता.

परंतु ज्यावेळेस कायदेतज्ज्ञ प्रा. झेनिंग यांच्याशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संपर्क आला व भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी चर्चा झाली त्यावेळी प्रा. झेनिंग म्हणाले, पंडित नेहरू तुमचा हा प्रकार म्हणजे ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असा आहे. कारण कायद्याच्या उच्च दर्जाच्या पदव्या घेतलेली आणि कायद्याचे प्रचंड ज्ञान असलेली एक व्यक्ती डॉ. भीमराव आंबेडकर तुमच्याच देशात आहेत. तुमच्या भारत देशाची घटना परकीय व्यक्तीला लिहिणे शक्य नाही. कारण भारत हा विविध जाती, भाषा, धर्म, पंथ यांनी बनलेला आहे. अनेक जाती समूहांमध्ये विभागलेला आहे.

त्यामुळे डॉ. भीमराव आंबेडकरच भारत देशाची घटना लिहू शकतात. कारण भीमराव आंबेडकर हे मानववंश शास्त्रज्ञ आहेत. मानववंश शास्त्राचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला आहे. या देशातील जाती, उपजाती व त्यांची उत्पत्ती याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध या धर्मांचा अभ्यास डॉ. भीमराव आंबेडकरांनी जेवढा केला आहे तेवढा भारत देशातील कुठल्याही राष्ट्रीय नेत्याने केलेला नाही. त्यामुळे तुम्ही डॉ. भीमराव आंबेडकरांनाच भारताची राज्यघटना लिहिण्याची संधी द्या आणि महात्मा गांधीजींच्या आदेशाचे पालन करा.

कुटुंब नियोजन योजनेचे समर्थन करणारे डॉ. आंबेडकर या लेखात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम याविषयी बाबासाहेबांचे अनमोल विचार आहेत. थोर समाजसुधारक र. धो. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य या मासिकाविरुद्ध सरकारी अधिकार्‍याने खटला भरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी र. धो. कर्वे यांचे वकीलपत्र घेऊन कायद्याच्या ज्ञानाच्या जोरावर कर्वे यांना निर्दोष सोडवले.

त्यांच्या सामाजिक कामाला नेहमीच पाठिंबा दिला. याची संपूर्ण माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव देश-विदेशातील अनेक विद्वानांनी केला आहे. डॉ. अमर्त्य सेन, प्रा. एडविन सेलिग्मन (कोलंबिया विद्यापीठातील थोर अर्थतज्ज्ञ), विजया राजपाक्षे (श्रीलंका), अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही विचार या पुस्तकात आहेत.

=लेखक – प्रा. डॉ. गौतम बेंगाळे
=प्रकाशक – प्रेरणाभूमी प्रकाशन, सोलापूर.
=मूल्य – १२० रुपये, पृष्ठे – ९८

First Published on: April 25, 2024 9:27 PM
Exit mobile version