रक्त गोठवणार्‍या सीयाचीनमधील भारताचे ऑपरेशन मेघदूत!

रक्त गोठवणार्‍या सीयाचीनमधील भारताचे ऑपरेशन मेघदूत!

मूठभर सैन्याच्या जोरावर बलाढ्य शत्रूच्या नाकीनऊ आणण्याचा इतिहास भारताचा आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत भारतीय लष्कराचा हाच लढाऊबाणा पाहायला मिळतो. 1962 चे युद्ध वगळता भारत प्रत्येक युद्धात विजयी झाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1962 दरम्यान भारत आणि चीन युद्ध झाले. हे युद्ध तवांग भागात झाले. त्या भागात भारतीय लष्कराची सज्जता नव्हती. पायाभूत सोयीसुविधा नव्हत्या. भारतीय जवानांच्या निवासाची व्यवस्था नव्हती. तेथे लष्कराची फारशी तैनाती नसल्याने त्या भागातील वातावरणाशी जुळवून घेताना जवानांना अडचणीचे ठरत होते. हीच बाब चिनी सैनिकांनी हेरली होती. परिणामी भारतीय लष्कराला चीनसमोर टिकाव धरता आला नाही, पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. चीनच्या विस्तारवादी वृत्तीला आपण बर्‍यापैकी लगाम घातला आहे. त्यामुळेच लडाखमधील गलवान खोर्‍यात मे आणि जून 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगत्से येथे 9 डिसेंबर 2022 रोजी चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हुसकावून लावत त्यांना त्यांच्या चौक्यांवर परत जाण्यास भाग पाडले, पण चीनच्या कुरापती अद्याप सुरूच आहे.

तर दुसरीकडे, पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानबरोबर अनेक वेळा लहानमोठे संघर्ष झाले आहेत. पाकिस्तानसमवेत चार मोठी युद्धे झाली. चारही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले. त्यापैकी 1971चे युद्ध सर्वाधिक गाजले. त्याच युद्धामुळे बांगलादेशची निर्मिती झाली, पण याच्याबरोबरीने पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने भारताबरोबर छुपे युद्ध सुरूच ठेवले, पण त्यालाही भारताने बर्‍यापैकी आळा घातला. 2016चा सर्जिकल स्ट्राईक आणि 2019चा एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला भारतीय लष्कराने धडा शिकवला. विशेष म्हणजे, परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख असताना त्यांच्या मनात भारताबद्दल खूप खदखद होती. भारताने जेव्हा जगातील सर्वात उंच युद्धभूमी समजली जाणारी सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेतली, तेव्हा त्यांची ही खदखद आणखी वाढली. पाकिस्तानने या सियाचीन ग्लेशियर भागावर ताबा मिळवण्याची पूर्ण तयारी केली होती, पण ऐनवेळी भारतीय लष्कराने त्यावर पाय रोवत पाकिस्तानचे हे प्रयत्न उधळून लावले. एका भारतीय जवानाच्या सतर्कतेमुळे या भूभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आणि भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन मेघदूत’ हाती घेतले आणि हे ऑपरेशन अद्यापही चालू ठेवून पाकिस्तानच्या इराद्यांना मूठमाती दिली.

भारत आणि पाकिस्तानमधील 1972 च्या युद्धानंतर जो करार झाला, त्यात एलओसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तयार करण्यात आली. ही रेषा एनजे 9842 या बिंदूपर्यंत होती. त्याच्या लगत सियाचीन हा भाग आहे, पण भारतीय लष्करातील कर्नल नरेंद्र कुमार यांना या भूभागाबद्दल पाकिस्तानने केलेल्या आगळीकीची कल्पना आली. बुलकुमार म्हणून ओळखल्या जाणारे कर्नल नरेंद्र कुमार हे चांगले गिर्यारोहकही होते. 1977 मध्ये एक जर्मन टीम भारतात आली होती. त्यांच्यासमवेत सिंधू नदीमध्ये राफ्टिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, जर्मनीच्या टीमकडे एक वेगळा नकाशा आहे. त्या नकाशानुसार सियाचीन ग्लेशियर हा पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आला होता. त्यांनी लगेच तत्कालीन लष्करप्रमुख टी. एन. रैना यांना त्याची माहिती दिली. सेक्टर कमांडर ब्रिगेडियर व्ही. एन. चन्ना यांनी ऑपरेशन मेघदूतची आखणी केली. त्यासाठी एका तुकडीला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्रामुख्याने कडाक्याच्या थंडीत आणि विपरित वातावरणात राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कारण सियाचीन ग्लेशियर हे जवळपास 22 हजार फूट उंचावर असून तिथे उणे चाळीस तापमान असते. एकूण 30 जणांची ही तुकडी 13 एप्रिल 1984 रोजी हेलिकॉप्टरमधून सियाचीनला उतरली. त्याचे नेतृत्व कॅप्टन संजय कुलकर्णी यांनी केले. ते निवृत्त झाले तेव्हा लेफ्टनंट जनरल होते, अशी माहिती युद्धनीतीचे अभ्यासक नितीन गोखले यांनी दिली.

त्यावर्षी 13 एप्रिलला बैसाखी सण होता. पाकिस्तानमधील पंजाबमध्येही तो उत्साह होता. त्यामुळे त्यांना बेसावध ठेवत, ही मोहीम ब्रिगेडियर चन्ना यांनी राबविली. पूर्ण टीमला संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते. सर्व जवानांना ऊबदार कपड्यांबरोबरच अँटिग्लेअर गॉगल्स देण्यात आले होते. कधी कधी एवढे कडक ऊन असते आणि चारी बाजूला बर्फ असतो. अशा वेळी जवळपास तीन दिवस स्नो-ब्लाइंडनेस येतो. ग्लोव्हज् न घालता बंदूक हातात घेतली, तर ती हाताला चिकटायची आणि तशीच खेचून काढली तर हाताचे मांस तिला चिकटलेले असायचे, असे लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. या तुकडीने एकच सूत्र अवलंबले होते… हात में सोटी, पेट में रोटी आणि चाल छोटी… म्हणजे हातात काठी घेऊन बर्फाचा अंदाज घेत चालायचे. वेळेत जेवायचे, कारण पोट रिकामे असले की, मेंदू काम करत नाही. डोक्यात तोच विचार राहतो आणि सावकाश चालायचे, त्यामुळे दम लागत नाही. कारण एवढ्या उंचीवर श्वासोच्छवास सहजपणे घेता येत नाही.

सियाचीन भागात कडाक्याच्या थंडीबरोबरच हिमवृष्टी, बर्फाचे वादळ, हिमस्खलन, जवळपास ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अशा लहरी वातावरणाला तोंड देत ही टीम तिथे राहात होती. मग सुरक्षिततेसाठी एका रश्शीला तीन-चार जण बांधलेले असायचे. अशा परिस्थितीत तहान-भूक, झोप काहीही लागत नव्हते. फक्त एकच स्वत:च्या मनाला उभारी देत राहणे, एवढेच प्रत्येकाच्या हातात होते. मी हे करू शकतो, या परिस्थितीत राहू शकतो… हे काही दिवसांपुरतेच आहे, असे स्वत:ला समजावायचे. गंमत अशी की, केवळ या वातावरणाला तोंड द्यायचे नव्हते, तर आपला शत्रू पाकिस्तानी सैन्य हेदेखील तिथेच होते, असे वास्तव लेफ्टनंट जनरल कुलकर्णी यांनी मांडले आहे. सियाचीनवर तैनात सैनिकांसाठी दिवसाला साधारणपणे दीड ते तीन कोटी रुपये खर्च केला जातो, मात्र सियाचीन ग्लेशियरचे महत्त्व आणि भारताची सुरक्षा लक्षात घेता, हा खर्च नगण्य आहे. पाकिस्तान आणि चीन याच्यामधे सियाचीन ग्लेशियर आहे. त्यामुळे या दोन्ही शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर भारताला लक्ष ठेवता येते. भारत तेथून बाजूला झाला, तर आपली दोन्ही शत्रूराष्ट्रे तिथे एकत्र येऊ शकतात. ते भारताच्या हिताचे नाही.

सियाचीन ग्लेशियर भारताच्या ताब्यात असणे, ही बाब पाकिस्तानचे तत्कालीन ब्रिगेडिअर परवेझ मुशर्रफ यांना खटकत होती. भारताने जेव्हा सियाचीनचा ताबा घेतला, तेव्हा ‘भारत ने हमको चकमा दिया,’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. त्यांनी 1986-88 यादरम्यान सियाचीन पाकिस्तानच्या ताब्यात घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, ऑक्टोबर 1998 मध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी मुशर्रफ यांची नियुक्त झाली आणि लगेचच मुशर्रफ यांनी सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा डावपेच रचण्यास सुरुवात केली. 1999 साली पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेली घुसखोरी हा त्याचाच एक भाग आहे. सलग तीन महिने चाललेल्या युद्धात भारतीय शूर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले आणि तो भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. परिणामी, सियाचीनवर कब्जा करण्याचे मुशर्रफ यांचे स्वप्न पुन्हा भंगले.

सियाचीन ग्लेशियरवर आजघडीला जवळपास 3000 भारतीय सैनिक तैनात आहेत. हे सैनिक तीन-तीन महिने तिथे तैनात असतात. त्यानंतर दुसरी टीम तिथे जाते. तेथील वातावरण लक्षात घेता, वैद्यकीय सल्ल्यानुसार हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता 1984 च्या तुलनेत तेथील सोयीसुविधांमध्येही खूप बदल झाला आहे. सुरुवातीला आपल्याकडे जी हेलिकॉप्टर्स होती, ती 20 हजार फुटांच्या वर नेली जात नव्हती, पण आता चांगल्या क्षमतेची हेलिकॉप्टर आहेत, पण तरीही त्यावेळी हेलिकॉप्टरचे वैमानिक 20 हजार फुटांहून जास्त उंचीवर हेलिकॉप्टर नेऊन सैनिकांना सियाचीन ग्लेशियरवर उतरवत होते. याचे कारण लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे. ते सांगतात, 1984 असो वा 2024 असो, कोणतीही रँक असो देशप्रेम तेवढेच ओतप्रोत भरलेले आहे…

First Published on: April 14, 2024 10:32 PM
Exit mobile version