कोकणी माणसा जागा हो..!

कोकणी माणसा जागा हो..!

मुंबई महानगर, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या परिसरात कोकणातील समाज हा नोकरी चाकरीच्या निमित्ताने स्थिरस्थावर झालेला आहे. गणपती उत्सव म्हटला की कोकणी माणूस अगदी मिळेल त्या वाहनाने आणि येतील ती संकटे अंगावर झेलत कोकणातील त्याचे गाव गाठतोच. गणेशोत्सव हा कोकणातील वर्षभरातील एकमेव काळ असा आहे की या उत्सवाच्या काळात कोकणातील प्रत्येक घर आणि घर हे मुंबईकर चाकरमान्यांनी भरलेले असते. गावात, वाडीत चहल पहल असते. निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एरवी माणसांची वर्दळ तुरळकच असते, मात्र कोकणातील गावे, वाड्या, वस्त्या या खर्‍या अर्थाने जिवंत होतात त्या गणेशोत्सवातच.

अर्थात कोकणातील माणूस हा जेवढा धर्मभोळा आहे, तेवढाच तो सोशिक आणि सहनशीलदेखील आहे. तो अमाप पैशाच्या मागे धावणारा नाही, मात्र त्याच्या याच सोशिकपणाचा आणि सहनशीलतेचा आजवर वापर करून घेण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबई नागपूर समृद्धी हायवे अत्यंत जलदगतीने पूर्ण करणार्‍या सरकारने मुंबई-गोवा हायवे मात्र गेली बारा वर्षे रखडत ठेवला आहे यासाठी तो कधी पेटून उठत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडतो. संपूर्ण महाराष्ट्राला वर्षभर मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा प्रचंड पाऊस कोकणात दरवर्षी पडत असतो, मात्र पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही व्यवस्था राज्य सरकारने केलेली नसल्यामुळे हे सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील रहिवाशांबरोबरच अन्य आसपासच्या जिल्ह्यांनाही स्वतःच्या धरणातून पाणीपुरवठा करता येऊ शकला असता, जर या जिल्ह्यामध्ये स्वतःचे मोठे धरण राज्य सरकारने बांधले असते, मात्र गडचिरोली जिल्ह्यापेक्षादेखील महाराष्ट्रात सरकारच्या लेखी अत्यंत दुर्लक्षित जिल्हा कोणता जर असेल, तर तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, असे म्हटल्यास कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. १९९९ साली तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये नारायणराव राणे यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. या अवघ्या चार साडेचार महिन्याच्या अल्प कालावधीतदेखील तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोकणातील चित्र पालटवण्याचा त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला. तथापि त्यांच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे म्हणावे तसे कोणीच लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

प्रशस्त लांब रुंद रस्ते आणि सक्षम दळणवळण व्यवस्था कोणत्याही प्रदेशाच्या मूलभूत पायाभूत विकासासाठी अत्यंत आवश्यक गरज असते. मुंबईतून कोकणात रस्ते मार्गाने यायचे तर गेली बारा वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम जे सुरू आहे ते अद्यापही सुरूच आहे. याबाबत वेळोवेळी राजकीय पक्ष पत्रकार संघटना या आवाज उठवतात, मात्र त्यानंतरदेखील या रस्त्याचे काम निश्चित कोणत्या वेळेत पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती आजमीतिला कोणाला देता येत नाही. त्यामुळे या रस्त्याने यायचे तर त्रास सहन करण्याची सहनशक्ती घेऊनच या मार्गे प्रवास करावा लागतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात जीपी विमानतळ मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आले, मात्र तेथील विमानसेवा ही अधूनमधून बंदच पडलेली असते.

कोकणात गर्दी होणार्‍या हंगामांमध्येदेखील मुंबईहून सिंधुदुर्गात चीपीवर दिवसभरात केवळ एक छोटेखानी विमान उतरते आणि तेच विमान पुन्हा मुंबईला उड्डाण करते. त्यामुळे विमानसेवा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून नसल्यासारखीच आहे. कोकण रेल्वेची स्थिती तर याहून वेगळी आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना आरक्षित तिकीट मिळाले तर लॉटरी लागली असेच समजावे लागते. कारण चार महिने आधी तिकीट बुक करणार्‍या चाकरमान्यांनाही आरक्षण मिळत नाही अशाच तक्रारी सर्वाधिक आहेत. यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्‍या कोकणी चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात दिलासा मिळालादेखील, मात्र एकूणच मुंबईतील मराठी माणसांना कोकणचे जे आकर्षण आहे, ते जर लक्षात घेतले, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पायाभूत आणि मूलभूत विकास होण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बाहेरचा वर्ग येणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र सरकारने तब्बल दोन वेळा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला आहे, मात्र पर्यटनासाठी आवश्यक असणारे वातावरण मूलभूत सोयीसुविधा आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीसाठी दिसणारी कमालीची अनास्था यामुळे गोव्यापेक्षाही विलोभनीय समुद्रकिनारे आणि निसर्ग सौंदर्याची भरभराट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटक येण्याचे प्रमाण हे गोव्याच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे.

पर्यटन जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यात उद्योगवाढीला वाव नाही. उद्योगधंदे नाहीत म्हणून स्थानिकांना सक्षम रोजगार नाहीत. जिल्ह्यात रोजगार मिळत नाहीत म्हणून मुंबई गोव्याला नोकरीसाठी जाण्यावाचून कोकणातील युवकांपुढे अन्य कोणताही पर्याय नाही आणि या एकूणच अशा परिस्थितीमुळे कोकणातील गावांमध्ये गणपती शिमगा असे जर हक्काचे सण सोडले, तर अन्य काळात लोकांची गर्दी नाही आणि या सार्‍या परिस्थितीचा परिणाम हा शेवटी कोकणातील स्थानिक अर्थकारणावर होताना दिसून येतो.

यंदा मुंबई, ठाण्यातून गणपतीसाठी कोकणात जाणार्‍या मुंबईकर चाकरमान्यांच्या सोयीसाठी शिवसेनेसह बहुतांश राजकीय पक्षांनी बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. कोकणातील माणसाने केवळ या बस गाड्यांच्या सुविधेवर आता समाधानी राहू नये. स्वतःच्या वाढीच्या विकासासाठी स्वतःच्या गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कोकणी माणसाने आता खर्‍या अर्थाने जागृत होण्याची गरज आहे. कारण आगामी भविष्यकाळ हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि जर या काळामध्ये कोकणी माणूस जागृत राहिला आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाला तरच कोकणी माणसाचे अस्तित्व हे गावापासून ते मुंबई पर्यंत टिकून राहू शकेल.

कोकणात प्रत्येक गावामध्ये धार्मिक सणांच्या निमित्ताने वेगवेगळी सांस्कृतिक मंडळी ही सामाजिक कामे करण्यात आघाडीवर आहेत. मुंबईतील चाकरमान्यांचीदेखील कोकणातील गावागावांमध्ये गाव विकास मंडळे विविध प्रकारचे ग्रामोपयोगी कामे करत असतात. या मंडळांनी तसेच स्थानिक गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जर गावामध्ये तसेच स्वतःच्या तालुक्यामध्ये अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी राजकीय व्यवस्थेवर दबाव निर्माण केला, तर निश्चितच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे भविष्यातील चित्र हे मोठ्या प्रमाणावर पालटलेले दिसू शकेल. गावातील वाड्या वस्त्यांपर्यंत तांबरी रस्त्यांचे जाळे, पाणीपुरवठ्याची पुरेशी सुविधा, २४ तास अखंड वीजपुरवठा आणि जागतिक करणाच्या या जगात बीएसएनएल सारख्या सरकारी सेवेबरोबरच खासगी मोबाईल कंपन्यांचे सक्षम नेटवर्क जर गावांमध्ये उभे राहू शकले, तर निश्चितच कोकणातील चित्र हे आगामी काळात खूप वेगळे होऊ शकते.

सिंधुदुर्ग जिल्हा हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे राज्य सरकारने जर एमटीडीसीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला, तर कोकणातील जी दुर्लक्षित पर्यटन स्थळे आहेत, तसेच नयनरम्य समुद्र किनारे आहेत, या स्थळांवर अधिकाधिक पर्यटकांना जाता यावे यासाठी जर दळणवळणाची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आणि पर्यटन वाढीस प्रोत्साहन दिले, तर त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची चांगली संधी निर्माण होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासालाही त्यामुळे हातभार लागू शकेल.

त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जर राज्य सरकारने परवडणार्‍या स्वस्त घरांवर भर दिला, तर येथे मोकळी जमीन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावर परवडणारी घरे ही मोठ्या प्रमाणावर उभारता येऊ शकतात. कोकणातील ९० टक्के वर्ग हा मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात राहणारा आहे, मात्र जर त्याला कोकणातच स्वतःचे चांगले घर मिळू शकले आणि रोजगाराची संधीदेखील तिथेच उपलब्ध होऊ शकली, तर आगामी भविष्यकाळात कोकणातील तरुणांना नोकरीसाठी त्याचे गाव सोडून मुंबई गोव्यात जाण्याची गरज भासणार नाही. व्यापार व्यवसाय हा त्याच्या भागातच विकसित होऊ शकेल आणि जर का कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थकारण विकसित होऊ शकले तरच कोकणातील भविष्यातील पिढ्या या दहा-पंधरा, वीस-पंचवीस हजारांच्या तुटपुंज्या पगाराच्या नोकरीसाठी मुंबई गोव्यात जाणार नाहीत.

First Published on: September 25, 2023 10:01 PM
Exit mobile version