सफाई कर्मचार्‍यांना कुणी वाली आहे का वाली?

सफाई कर्मचार्‍यांना कुणी वाली आहे का वाली?

विरारमधील ग्लोबल सिटी येथील खासगी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राची सफाई करत असताना चार सफाई कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी घडली होती. यात दोन तरुण सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच १५ एप्रिलला वसई पूर्वेकडील एव्हरशाईन इंडस्ट्रीजची सांडपाण्याची टाकी साफ करताना टाकीत गुदमरून एका सफाई कर्मचार्‍याला आपले प्राण गमवावे लागले होते.

ग्लोबल सिटीप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल केला असला तरी या दुर्दैवी घटनेनंतर खासगी कंपन्यांकडून चालवल्या जाणार्‍या सांडपाणी प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने निर्माण होत असलेल्या गृहप्रकल्पात असलेल्या सांडपाणी प्रकल्पांचे ऑडिट करण्याची गरज आहे. इमारती आणि घरांच्या सेफ्टीक टँकची सफाई खासगी कर्मचार्‍यांकडून केली जाते. महापालिकेने केलेल्या मनाई आदेशाकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

वसई-विरारमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात असतानाच रोजीरोटीसाठी विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सफाई करण्यासाठी उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. यात दोन सख्ख्या भावांचाही मृत्यू झाल्याने एकाच कुटुंबावर आघात झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी सांडपाणी प्रकल्पाची देखभाल करणार्‍या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे, पण गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाल्यानंतरही हा गंभीर विषय मार्गी लागेल का हा खरा प्रश्न आहे. कारण हा घटनेनंतर लगेचच म्हणजे १५ एप्रिलला वसई पूर्वेकडील एव्हरशाईन इंडस्ट्रीजमधील सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या एका सफाई कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विरार पश्चिम-ग्लोबल सिटी येथील २० ते २५ इमारतींकरिता रुस्तमजी या बांधकाम व्यावसायिकाने सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राची निर्मिती केली आहे.

या सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रात दीड ते दोन एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या देखभाल-दुरुस्ती आणि साफसफाईची जबाबदारी नालासोपारास्थित पॉलिकॉन या एजन्सीला देण्यात आलेली आहे, मात्र या कामाचा अनुभव नसलेल्या या एजन्सीने मागील तीन महिन्यांपासूनच या केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. तेव्हापासून या केंद्राची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी होत्या.

परिणामी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रात शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७), निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) या चौघा मजुरांचे जीव गेल्याची घटना घडली. सुरक्षा साधने न घेताच पाण्यात उतरलेल्या या चौघांचा दूषित वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे उजेडात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाकीत उतरलेला एक कर्मचारी बाहेर येत नाही, असे पाहून एकापाठोपाठ तब्बल चार जण आपल्या सहकार्‍याच्या मदतीसाठी टाकीत उतरले होते. दुर्दैवाने चौघांचाही मृत्यू झाला. यावरून सांडपाणी प्रकल्पाची देखभाल करणार्‍या कंपनीचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

पॉलिकॉन एजन्सीने मजुरांच्या जीविताची काळजी घेणारी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. आर्थिक बचत करण्याच्या प्रयत्नात या चौघांचे बळी घेतलेले आहेत. संबंधित बांधकाम व्यावसायिकानेही आर्थिक बचतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची देखभाल-दुरुस्ती आणि सफाई कमी पैशात करेल अशा एजन्सीला काम दिल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे निर्मितीपासूनच सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र वादात सापडलेले होते. या सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राशेजारी शाळा असल्याने विद्यार्थ्यांनी दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी केलेल्या होत्या. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल, असा आक्षेप घेत त्याला विरोध करण्यात आलेला होता, मात्र बांधकाम व्यावसायिकाचीच शाळा असल्याने पालक थेट तक्रार करू धजावत नव्हते, अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली आहे.

ही घटना ताजी असतानाच १५ एप्रिलला सांडपाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या एका सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. वसईच्या चिंचपाडा येथील एव्हरशाईन इंडस्ट्रीच्या सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी दुपारी तिरुपती भुट्टे (३३) या सफाई कामगाराला बोलावण्यात आले होते. दुपारी तीनच्या सुमारास कुठल्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय तो टाकीत उतरला होता, मात्र टाकीतील विषारी वायूमुळे त्याचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी आधी आयकॉन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नंतर प्रकृती खालावल्याने महापालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राज्य शासनाच्या ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ या कार्यक्रमांतर्गत हाताने मैला व मल:जल वाहिन्या (भुयारी गटार) सफाई करण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. शहरातील कोणत्याही नागरिकांनी त्यांच्या इमारतीच्या, घराच्या किंवा वाणिज्य इमारतीच्या मैला टाकी सफाई करण्यासाठी कोणत्याही खासगी सफाई कामगारांकडून मानवीयरीत्या सफाई करून घेऊ नये.

मैला टाकीची मानवीयरीत्या सफाई करणे धोकादायक आहे. यामुळे संबंधित कामगाराचे प्राण जाऊ शकतात. अशा प्रकारचे काम करताना आढळल्यास संबंधित काम करून घेणार्‍या तसेच करणार्‍या नागरिक अथवा संस्था-संघटना यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत, मात्र हा आदेश धुडकावत वसई-विरार शहरात अकुशल सफाई कर्मचार्‍यांकडून अशी कामे करून घेतली जात असल्याचे दिसून येते.

एकतर अकुशल कामगार कमी पैशात उपलब्ध होतात. त्यांच्या कोणत्याही साधनसामुग्री अथवा सुरक्षितेतची काळजी घेण्याची गरज वाटत नाही. वसई-विरार शहरात भुयारी गटारे, सेफ्टीक टँक, सांडपाणी प्रकल्प यांची स्वच्छता मानवी पद्धतीने करवून घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या साधनांविनाच ही स्वच्छता केली जात आहे. यामुळे विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असून सफाई कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न गटारात असे खेदाने म्हणावे लागत आहे.

असे प्रकार रोखण्यासाठी खासगी इसमांकडून मानवी पद्धतीने मैला टाकी साफ करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे, मात्र या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करून मानवी पद्धतीने भूमिगत गटारे आणि सेफ्टीक टँकची साफसफाई केली जात आहे. सुरक्षेच्या साधनांचा वापर केला जात नसल्याने टाकीत तयार होणार्‍या विषारी वायूचा मोठा परिणाम हा सफाई कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. काही वेळा या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत.

अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही खासगी सफाई कर्मचार्‍याकडून सेफ्टीक टँक साफ करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतःची यंत्रणा निर्माण केली आहे. टाक्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेकडे अत्याधुनिक उपकरणे व प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी मैला स्वच्छता वाहने व सक्शन पंप वाहने खरेदी केली आहेत. महापालिकेकडून शहरवासीयांना यासंबंधी वारंवार जागृतही केले जात असते.

पण कमी पैशांच्या आमिषाने महापालिकेचा मनाई आदेश झुगारून खासगी सफाई कर्मचार्‍यांकडून सेफ्टीक टँक साफ करून मनाई आदेश धुडकावले जात असल्याचे पाहावयास मिळते. हाताने मैला उचलणार्‍या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम, २०१३ या कायद्यान्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा संबंधित गुन्हेगारास होऊ शकतात. असा गुन्हा पुन्हा घडल्यास संबंधितावर पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा पाच लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

वसई-विरार महापालिका हद्दीत अनेक मोठमोठी निवासी, वाणिज्य संकुले तयार झाली आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक असल्याने केले जात आहेत, मात्र सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीची कंत्राटे खासगी कंपन्यांना दिली जातात.

ठेकेदार आर्थिक फायद्यासाठी दुरुस्तीची कामे करताना दिसत नाहीत. महापालिकेकडून अशा प्रकल्पांचे नियमितपणे ऑडिट करण्याची नितांत गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कायद्याचा धाक नसल्यानेच ठेकेदार सफाई कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात घालत आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी महापालिकेने करण्याचीही नितांत गरज आहे.

First Published on: May 2, 2024 11:35 PM
Exit mobile version