एका ठाकरेंना शह देण्यासाठी दुसर्‍या ठाकरेंचा वापर!

एका ठाकरेंना शह देण्यासाठी दुसर्‍या ठाकरेंचा वापर!

भाजपला या लोकसभा निवडणुकीत चारसौ पारचे लक्ष्य काहीही करून गाठायचे आहे. त्यामुळे कुठलीही कसूर राहता कामा नये याची काळजी घेण्यात येत आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपसाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. कारण भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखालील शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना बाहेर काढून राज्यातील सत्ता मिळवली, पण त्यांची अवस्था सत्ता आली, पण लोकांचा विश्वास गमावला अशी झालेली आहे. भाजपने दिलेला शब्द मोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपचा मोठा अपेक्षाभंग केला.

त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात ठाकरे यांच्याविषयी सूडभावना निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द देऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडली. भाजपने खरेतर या फोडाफोडीतून काय मिळवले हे कळण्यास मार्ग नाही. कारण शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद घालवून त्यांना पुन्हा एकनाथ शिंदे या शिवसेनेच्याच नेत्याला मुख्यमंत्री बनवावे लागले. इतकेच नव्हे तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळी मदत करावी लागली.

भाजपचा प्रवास हा शिवसेनेकडून पुन्हा शिवसेनेकडे असाच झालेला आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागत होते, पण भाजपला ते द्यायचे नव्हते, पण पुढे नव्याने मान्यता मिळालेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यावर त्यांना दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद द्यावे लागले. इतकेच नव्हे तर २०२४ ची विधानसभा निवडणूक महायुती एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवेल, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

भाजप सत्तेत आली, पण मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही यांची खंत भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री हा भाजपचा व्हावा असे भाजपला वाटते, पण ते वाटते तितके सोपे नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना अशी मान्यता मिळाल्यानंतर ते आता त्या रुबाबात भाजपशी वागू लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही शिंदे तुटपुंंज्या जागांवर समाधानी राहणार नाहीत.

भाजपच्या जोडीला महायुतीत शिंदे यांच्यासोबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. त्यांनाही लोकसभा निवडणुकीत न्याय द्यावा लागणार आहे. सध्या पवार घराण्यातील सग्यासोयर्‍यांकडूनच टीकेचे लक्ष्य झालेले अजित पवार यांना या महायुतीत कशा प्रकारे न्याय मिळतो ते पाहावे लागेल, नाहीतर दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी त्यांची अवस्था होऊ शकते. कारण आता बहुतांश पवार कुटुंबीय हे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांचे पारडे हलके होताना दिसत आहे. परिणामी महायुतीत त्यांना कसा मान दिला जातो हे पाहावे लागेल.

खरेतर अजित पवार हे आपले काका शरद पवार यांच्यावर नाराज होऊन मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा घेऊन महायुतीत आले होते, पण आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, जो दिला होता तो आम्ही पाळला, असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याविषयी अजित पवार यांना बोलायला काही जागाच उरलेली नाही. भाजपने आपल्या महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना आणली आणि अजित पवार यांच्या माध्यामातून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत आणली.

इतकेच नव्हे तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात वारंवार येऊन मोठमोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकर्पण करत आहेत. अगदी लोकांचे डोळेच नव्हे तर मने दिपून जातील असे वातावरण निर्माण केले जात आहे. तरीही भाजपला महाराष्ट्रात स्वत:हून निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत होत नाही. कारण भाजपने साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्यात सत्ता आणली, पण त्यांनी केलेले प्रकार लोकांच्या पचनी पडलेले नाहीत. दरम्यानच्या काळात राज्यात काही पोटनिवडणुका झाल्या, पण त्यात भाजपला फटका बसला.

त्यामुळे महायुतीचे नेतृत्व करणारा भाजप राज्यातील कुठल्याच निवडणुकीला सामोेरे जायला तयार नाही. निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अडकून पडलेल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रात सत्ता असलेल्या भाजपने पाठपुरावा करायला हवा होता, पण तसा काही जोरकस प्रयत्न होताना दिसत नाही. महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू करून लोकप्रतिनिधींना घरी बसवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांवर लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही.

महाराष्ट्रात सुमारे अडीच वर्षे भाजपने मोठी खटपट केली. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन महायुतीची सत्ता आणली, पण तरीही उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला भारी पडेल असे वाटत असल्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भाजपने जोरदार भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आणण्यात भाजपला यश आले असले तरी शिंदे हे काही ठाकरे नाहीत याची भाजपला कल्पना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेला सडेतोड टक्कर देण्यासाठी राज ठाकरे हेच योग्य आहेत हे भाजप नेत्यांना माहीत आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांना काही तिकिटे देण्यासोबत त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा वापर भाजप राज्यभर नक्कीच करून घेईल यात शंकाच नाही. त्याचसोबत राज ठाकरे यांचीही आता पडती बाजू आहे. त्यांच्या पक्षाचा निवडणुकीतील प्रभाव कमी झालेला आहे. राज ठाकरे यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो, पण मतदान होत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची निवडणुकीतील डिपॉझिट्स जप्त होण्याची वेळ येते. त्यामुळे यातून आता कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न राज ठाकरे यांना पडला असावा.

यापूर्वी लाव रे तो व्हिडीओ हे अभियान चालवून त्यांनी भाजपच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली होती. पुढे एकदा त्यांना ईडीची नोटीसही आली होती. त्यात पुन्हा आता राज ठाकरे यांना भाजपसोबत जाण्यात नवी संधी दिसत आहे. कारण राज्यात विधानसभेत भाजपचे बहुमत येऊ शकत नाही याची कल्पना राज यांना आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून त्या माध्यमातून आपल्या पक्षामध्ये नवी ऊर्जा निर्माण करता येईल. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांचा जो मराठी नेता म्हणून प्रभाव आहे, ती जागा आपल्याला घेता येईल असाही राज यांचा विचार असावा.

उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे, पण निवडणुकांमध्ये लढणारे त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येताना दिसत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीत प्रवेश केल्यावर मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करताना स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कोंडी झाली होती. विचारसरणी जुळत नव्हती. त्यामुळे अनेक लोक पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत आले.

शिवसैनिकांची वैचारिक पातळीवर झालेली ही कोंडी उद्धव ठाकरे यांना महागात पडली आहे. त्याचसोबत भाजपने शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मागे जो ईडीचा ससेमिरा लावला होता, त्याचाही परिणाम होऊन शिवसेनेतील बरेच जण भाजपमध्ये आले. यावेळी लोकसभा निवडणुकीत चारसौ पार करून विजयाची हॅट्ट्रिक करण्याची पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व शक्ती पणाला लावली जात आहे.

उद्धव ठाकरे आपले ऐकत नाहीत म्हणून त्यांना कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना ताब्यात घेण्यात आली. शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार यांना भाजपने आपल्या सरकारमध्ये घेतले. तरीही राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी वक्ता आपल्या बाजूने आला तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जोरदार टक्कर देता येईल, असे भाजपला वाटत असावे. कारण लोहा लोहे को काटता हैं तसेच एका ठाकरेंचा प्रभाव कमी करण्यासाठी दुसरा ठाकरेच लागणार, त्यामुळे राज यांना आपल्या गोटात घेण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे.

First Published on: March 20, 2024 10:15 PM
Exit mobile version