फलज्योतिषांची लुडबुड लोकांनीच थांबवावी…

फलज्योतिषांची लुडबुड लोकांनीच थांबवावी…

कोणतेही सण-उत्सव हे स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडणे, प्रेम व ममतेपोटी एकत्र येणे, सर्वांनी एकत्र स्नेहभोजन करणे, परस्परांच्या सुख-दुःखाची चर्चा करणे, दैनंदिन जीवनातील कटकटी, ताणतणाव यांचा काहीअंशी का होईना निचरा, निरसन करणे, आप्तेष्टांसमवेत आनंदाचे क्षण उपभोगणे, धार्मिक व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होणे, अनेक विधायक गोष्टींची चर्चा करणे, कृतज्ञता व्यक्त करणे अशा अनेक उद्देशांनी साजरे केले जातात. किमान अशा हेतूने साजरे व्हावेत. कारण आता ती समाजाची मोठी गरज निर्माण झाली आहे.

भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्वच सण-उत्सव हे निसर्ग नियमांशी साधर्म्य साधणारे असून ऋतूमानांशी एकरूपता दर्शवणारे आहेत. त्याचा फायदा मानवाबरोबरच इतर सजीव प्राण्यांनाही होत असतो. आज अशा सण-उत्सवांची जपणूक संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. सामाजिक, सांस्कृतिक व भावनिक पातळीवर साजर्‍या केल्या जाणार्‍या सण-उत्सवांमध्ये आकाशातील ग्रहगोल, तारे यांचा काहीही संबंध नसतो. पण समजा, ‘आहे’, असे कुणी म्हणत असेल तर शास्त्रीय कसोट्यांवर तो सिद्ध करता यायला हवा, पण तसे घडत नाही. सण-उत्सवांची मांडणी मानवाने स्वतःच्या गरजेपोटी आणि अधिकांश निसर्गाला सोबत घेऊन, त्याच्या नियमांना अनुरूप अशीच केल्याचे सर्वत्र दिसून येते, मात्र ही सर्व मांडणी, सादरीकरण हे कालसुसंगत होणे आवश्यक असते, मात्र ते, तसे मोठ्या प्रमाणात झालेले नाही.

सण-उत्सवातील परंपरागत रूढी, प्रथा, चालीरीती व त्यामधील अनेक अनिष्ट, कालबाह्य बाबी आजही जशाच्या तशा पाळल्या जातात. कोणतेही सण-उत्सव हे निसर्गाला ओरबडल्याशिवाय साजरेच होत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येते. अनेक सण-उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषणाला कारणीभूत कर्मकांडे मोठ्या उत्साहाने पार पाडली जातात. विशेष म्हणजे जवळपास प्रत्येक धर्मातील अनेक सण-उत्सव हे अतिशय बेजबाबदारपणे मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या समूहाच्या उपस्थितीत साजरे केले जातात.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक धर्मातील, प्रत्येक सण उत्सवामध्ये कालसुसंगत परिवर्तन घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक आणि व्यापक प्रमाणात संघटितपणे प्रयत्न होणे आवश्यक होते, मात्र तसे अगदीच थोड्या प्रमाणात घडते. आतातर सण-उत्सवांना मोठ्या प्रमाणात उधान आलेले आहे. त्याचे बाजारीकरण आणि व्यापारीकरण झाल्याचेही आपण पाहतो. त्यामुळे त्या त्या धर्मातील व समाजातील व्यक्तींची आणि कुटुंबांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी तर होतेच शिवाय भावनिक आणि मानसिक कुचंबणाही होते. याचाच गैरफायदा घेऊन काही लबाड लोकांनी फलज्योतिष या थोतांडाला व्यवसायाचे रूप दिले आहे. स्वतःच्या तसेच पुढील पिढ्यांच्या पोटापाण्याची अगदी व्यवस्थित सोय त्यांनी केलेली आहे. फलज्योतिषी जे भविष्य कथन करतात, त्यांची ती भाषा अतिशय संदिग्ध असते. सामान्य माणसाला ती कळत नाही. शिवाय ते अतिशय भंपक दावे करतात. त्यावर सामान्य माणूस विश्वास ठेवतो आणि फसतो.

समाजाच्या अज्ञानाचा, अगतिकतेचा, भावनांचा, संवेदनशीलतेचा गैरफायदा घेऊन, लोकांच्या मनात काळ-वेळेबद्दलचे मुहूर्त, शुभ-अशुभ गोष्टी सांगून फलज्योतिषी उगाच साशंकता, संभ्रम निर्माण करतात आणि स्वतःचे महत्व वाढवतात, असे दिसून येते. त्यामुळे फलज्योतिषांचा हा विनापरिश्रमाचा धंदा त्यांना नेहमीच मोठ्या बरकतीचा ठरत असतो. नुकत्याच साजर्‍या झालेल्या रक्षाबंधनाच्या वेळी काही तथाकथित फलज्योतिषांनी सांगितले होते की, त्या दिवशी भद्रा हा अशुभ योग असल्याने सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू नये. काहीही शास्त्रीय पुरावा नसताना असे सांगणे म्हणजे समाजात एक प्रकारची भीती निर्माण करण्याचाच हा प्रकार आहे.

त्याचवेळी दुसर्‍या ज्योतिषांनी सांगितले की भद्रा योगाचा रक्षाबंधनाशी काही संबंध नाही. खुशाल रक्षाबंधन करावे. तथाकथित फलज्योतिषांच्या दोन भविष्यकथनातील ही विसंगती काय दर्शविते? याचा विचार आपण करणार की नाही? आणि करणार आहोत तर कधी करणार? भारतीय अवकाश संशोधन संस्थेमार्फत पाठवलेले चांद्रयान-३ हे नुकतेच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. याबद्दल भारतातील कोणत्याही तथाकथित फलज्योतिषाने याबद्दल ठोसपणे काहीही कथन केलेले नव्हते. त्यानंतर अनेकांनी चांद्रयानाच्या कुंडल्या मांडण्याचा खुळचट प्रयोग चालू केला आहे.

आपल्याकडे वर्षभर विविध जात-धर्मीयांच्या सण-उत्सवांची मांदियाळी असते. सणउत्सवापाठोपाठ कर्मकांडे आलीच. नेमके अशाच वेळी हे भविष्यवेत्ते पुढे सरसावतात. कोणत्या वेळी, कोणते कर्मकांड करायचे याबाबतचे मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ सांगण्याचा जणू जन्मदत्त हक्कच त्यांच्याकडे असतो. वर्षानुवर्षे हेच चालत आलेले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या सण-उत्सवातील अनेक निरर्थक, कालबाह्य कर्मकांडांबद्दल येथील संत, महापुरुष यांनी त्यांच्या विचार, आचार व अनेकांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून महाराष्ट्राला आदर्श घालून दिलेला आहे.

छत्रपती शिवरायांनी कोणतेही मुहूर्त न पाहता अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्याही!! महात्मा फुले असे म्हणत की, कोणतेही मुहूर्त न पाहता इंग्रज लोकांचे विवाह होतात आणि त्यांच्या मडमा (मॅडम) आयुष्यभर सुखाने संसार करतात, मात्र आमच्याकडे मुहूर्त पाहून विवाह होतात आणि अकालीच आमच्या मुलींच्या आयुष्यात वैधव्य येते. त्यामुळे आमच्या मुलींना जन्मभर विधवा म्हणून वंचित आयुष्य कंठावे लागते. विधवेच्या आयुष्यात असलेल्या सर्व प्रकारच्या जाचाला, त्रासाला, छळाला सामोरे जाता जाता, मरण यातना सोसाव्या लागतात.

हा जीवघेणा त्रास असह्य झाल्याने अनेक विधवा मुली, महिला लहान वयातच किंवा तारुण्यातच स्वतःचा जीवही गमावतात. जगविख्यात खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, एकविसाव्या शतकातील विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो की ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम होतात का? तेव्हा मला आश्चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्चर्य यासाठी की, एकविसाव्या शतकातील माणूस हा प्रश्न विचारतोय आणि खेद यासाठी की विचारणारा भारतीय आहे.

जर आपण आपल्या संतांचा, महापुरुषांचा, वैज्ञानिकांचा अभिमान बाळगतो. त्यांचा विचारवारसा सांगतो, तर मग हा विचार आपल्या आचरणात आणण्यासाठी आपण ऐनवेळी का कच खातो? का आपण आपल्या जीवनाचे सुकाणू फलज्योतिष या थोतांडाच्या आणि ते सांगणार्‍या तथाकथित थापेबाज माणसाच्या हाती सोपवतो? खरंतर, एखाद्या घटनेच्या केवळ एखाद्या दुसर्‍या निरीक्षणाने विज्ञानाचे नियम बनत नसतात. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, वाचने, वर्गीकरण, विश्लेषण, निष्कर्ष या घटकांच्या साह्याने कोणतीही घटना वारंवार तपासल्यानंतर त्यातील सत्य बाहेर येते. जगाच्या पाठीवर कुठेही त्याची सिद्धता करता येते. वास्तविक शुभ-अशुभ,पवित्र-अपवित्र, शकुन-अपशकुन अशा कोणत्याही बाबींना काडीचाही शास्त्रीय आधार नाही. ते केवळ माणसाच्या मनाचे खेळ आहेत.

वाईट याचे वाटते की, हे लबाड लोक स्वत:च्या फायद्यासाठी फलज्योतिष खरे असल्याचे भासवून थापा मारतात. आनंदाच्या आणि दु:खद प्रसंगीसुद्धा लोकांना सतत झुलवत ठेवतात. त्यांच्या शिवाय कोणतीही धार्मिक कर्मकांडे, विधी करता येणार नाहीत, अशी अदृश्य दहशत त्यांनी समाजात निर्माण करून ठेवलेली असते. बहुतांशी समाजही हे सर्व निमूटपणे स्वीकारतो आणि इमानेइतबारे त्याचे पालन करतो. यामध्ये अशिक्षितांपेक्षा मध्यमवर्गीय शिक्षितांचीच संख्या मोठी असते. शिक्षितांच्या अशा वागण्याने दुःख तर होतेच, परंतु अनेक वेळा चीडही येते आणि कीवही !!

खरंतर, फलज्योतिष हे मुळात शास्र नाहीच. कारण आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे फलज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध होत नाही. तरीही, अशा थोतांड विषयाला जाणिवपूर्वक लोकांच्या गळी उतरवणे, लोकांना मानसिक गुलामगिरीमध्ये सातत्याने अडकवून ठेवणे, त्यातून लोकांचे विविध मार्गांनी शोषण करणे, हा मोठा सामाजिक गुन्हा आहे. तरीही त्याची कुणी फार गांभीर्याने दखल घेत नाही. म्हणून लोकांनी अशा थोतांडावर आणि ते सांगणार्‍या तथाकथित फलज्योतिषांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

कोणत्याही प्रसंगात आणि कधीही त्यांच्या नादी लागून, नुकसान करून घेऊ नये. समस्या सोडविण्यासाठी नैतिक, समाजमान्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मार्गांचा अवलंब करावा. लोकांनी कोणतेही सण-उत्सव हे स्वत:च्या, कुटुंबीयांच्या एकूणच सर्व क्षमता व ऐपतीनुसार साजरे करावेत. कोणताही सणउत्सव साजरा करताना निसर्गाला झळ पोहचणार नाही, निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. सण-उत्सव हे सर्वांच्या आनंदासाठी, कौटुंबिक व सामाजिक एकोप्यासाठी असतात. हे सर्व सण-उत्सव सर्वांनी एकत्र येऊन, मिळूनमिसळून साजरे करावेत आणि मनसोक्त आनंद घ्यावा, द्यावा. यातच खरे मानवतेचे हित सामावलेले आहे.

First Published on: August 31, 2023 9:08 PM
Exit mobile version