कभी खुद पे कभी हालात पे रोना आया…

कभी खुद पे कभी हालात पे रोना आया…

‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…‘प्यासा’साठी साहिरनं असं जमान्याला सुनावलं होतं, आपल्यातल्या माणूसपणाचा सरेआम लिलाव करून आपापल्या कोशात आपापलं फसवं मोठेपण मिरवणार्‍या तुम्हा आमीर-उमरावांच जग तुम्हाला मुबारक असो, तुमचं कौतुक, पुरस्कार, सोहळे सगळंच खोटं आहे, अशा खोटेपणातून मिळालेल्या मोठेपणाचं मी काय करू? ‘ ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है’ आता अजून दिवाणखान्यातल्या दरवाजातल्या चौकटीवर हात ठेवून उभा राहिलेला गुरुदत्त या खोट्यांच्या मेहफीलीत दाखल व्हायचाय, प्यासातलं हे गाणं आजही तेवढंच रिलेवंट असतं.

साहिरचं जग माणसांच्या हतबलतेविरोधात बंड करणारं नव्हतं, हे बंड नाही, ही खंत असावी, खंत आपल्याच माणसांकडून असते. साहिरसाठी कोणाही परकं नव्हतं, माझं तुझं नव्हतं, त्याचं माणूसपणावर प्रेम होतं. माणसाच्या माणूसपणाची हमी देण्यासाठी भवतालाने दिलेल्या वचनात साहिरची फसवणूकच झाली. भारताच्या फाळणीनंतर त्यानं जगणं आणि ‘दफन’ होण्यासाठी पाकिस्तानची जमीन निवडली नाही, परंतु इथं काय मिळालं?, तर दंगे-धोपे, अत्याचार, फाळणीनंतर विशिष्ट गटाला कायम आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्यासाठीच राजकारण, स्वातंत्र्यानंतर दोन नवे देश उभारले जात असताना इथली-तिथली भूक, गरिबी, उदासीनता, माणसांचं माणूस म्हणून होणारं अवमूल्यन सारखंच होतं. यामुळे व्यथित झालेल्या साहिरनं भारताच्या ‘मेरा मुल्क’ म्हणून केलेल्या निवडीवर कधी पश्चाताप केला नाही, तो त्याच्या मनातही नव्हता, या निर्णयाबाबत साहिर लुधियानवी आणि सागर सरहदी हे दोघेही ठाम होते, अपवाद मंटोचा…

साहिरनं माणसांच्या वेदनेचं फूल बनवलं, साहिरच्या लेखनात म्हणूनच कुठंही जाणिवांवर बळजबरी आढळत नाही, जे कागदावर उतरतं ते अस्सल असतं, मग ती वेदना, व्यथा, प्रेम, आत्मियता, हतबलता, कौतुक, खंत…काहीही असो, जे जसं आहे तसंच उतरायला हवं, साहिरनंही स्वतःची फसवणूक केली नाही, ‘हमराज’ मधले ‘तुम अगर साथ देने का वादा करो….’ हे शब्द आठवावेत, ‘तुम ना समझो तुम्हारा मुकद्दर हूं मैं, मैं समझता हूँ तुम मेरी तक़दीर हो’ हे ‘त्यानं’ केवळ प्रेमातून ‘तिच्या’साठी लिहलेल्या ओळी नाहीत, फाळणीनंतर भारताची निवड करताना इथल्या मातीविषयीच्या या भावना असाव्यात, भारतात राहाण्याची ही ‘तकदीर’ त्यानं स्वतः निवडली होती. ‘कोई ढूंढने भी आए…तो हमें ना ढूंढ पाए…तू मुझे कही छुपाले, मै तुझे कही छुपांलू’ असं लिहणारा साहिर इथं लपायचं म्हणतोय, त्या जमान्यापासून ज्याला मोहब्बत, वफा, इश्क याच्याशी या शब्दांचं काहीही देणं घेणं नाही, ‘तुझे देवता बनाकर, मेरी चाहतों ने पूजा, मेरा प्यार कह रहा है, मै तुझे खुदा बनालूं…’ तिच्यावरची मोहब्बत हीच ‘ईबादत’ आणि तिलाच ‘खुदा’ बनवणारा शायर साहिरवर आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळात काळात ‘मजहबी बेअदबी’चा आरोप झाला असता.

विरहाचं दुसरं नाव साहिर असावं, या ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही’ कितीही ओतलं तरी मनाचा डोह संपणारा नाही, हा उसळणारा डोह शांत होतंच नाही, अस्वस्थता कायम आहे, ही अस्वस्थता त्याच्या ‘नज्म’मध्ये झिरपते. ‘तूम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी…’ तुझं माझ्यावर प्रेम नाही, हे एकवेळ कबूल करणारा साहिर तू दुसर्‍या कुणाला आपलंसं केलंस तर मात्र अडचण होईल, अशी प्रेमळ धमकीच देऊन टाकतो.

‘नाकाम मोहब्बत’च कदाचित परिपूर्ण असावी, सत्तरच्या दशकातला ‘इज्जत’ आठवतोय, ‘ये दिल तुम बिन कही लगता नही, हम क्या करे….’ ही नज्म नाही, संपूर्ण संवाद आहे. प्रेमातल्या पहिल्या अनुभूतीचा, सगळं गाणं पुन्हा ऐका, तिच्या आणि त्याच्यातला संवाद…संवाद आणि केवळ संवाद, हा साहिर होता. ‘किसका रस्ता देखे…ऐ दिल ऐ सौदाई…मिलो है खामोशी बरसो है तनहाई, भुली दुनिया तुझेभी, मुझेभी…फिर क्यूं आँख भर आयी, साहिरच्या काव्यात दुःख वेदना दाखल झाल्यावर त्यानंतरचं औषधही होतं, वेदनेचा उपाय होता, वेदना कुरवाळत बसणं साहिरच्या गावी नसावं, त्यामुळेच त्याच्या शायरीत उद्याच्या दिवसाची आशा पेरलेली होती. त्याचं कुठलंही गाणं, त्या अर्थानं रडगाणं नव्हतं. हतबल होणं, रडणं त्याच्या स्वभावात नसावं. शायरीची ‘शमा’ प्रज्वलित करून पुढचा मार्ग शोधण्यात साहिर वाकबगार होता, ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया…’ लिहिणारा साहिर ‘आगे भी जाने ना तू…पिछे भी जाने तू…जो भी है, बस यही इक पल है…असंही नेमकं उलटं लिहितो, त्यावेळी संभ्रम निर्माण करतो, माणसाचं जगणंच संभ्रमाचं असावं, इथं कोणतीच गोष्ट पक्की नाही, ढळणं, नवं साकारणं पुन्हा ढळणं, नामशेष होणं, सातत्यानं सुरूच असतं, साहिर बुद्धाच्या अनित्यतावादाचा पुरस्कर्ता असावा, म्हणूनच तो म्हणतो, ‘मन तू काहे ना धीर धरे…’ (चित्रलेखा १९६४) साहिरच्या गाण्यात निराशेवर आशेने केलेली मात आहे, मात्र ही आशाही उद्या निराशेत बदलू शकते, हेही साहिर जाणतोच…

साहिरचा काळ साठ सत्तरच्या दशकातला, साठच्या मध्यावर देशात उदासीनता होती, फाळणीच्या जखमा ठसठसत होत्या, सांप्रदायीक संशयाने भारलेला काळ, कामगार धोरणांच्या अपयशामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थ चळवळी, इंग्रज गेल्यानंतर देशानं घेतलेली स्वत:ची जबाबदारी, युद्धाचे जमलेले काळे ढग, आंधळ्या उमेदीच्या या सगळ्या वातावरणाचा साहिरच्या संवेदनशील मनावर परिणाम झालाच, उमेद नाही तर स्वप्नही नाहीच, जावेद अख्तरांनी साहिरला विन्सेट व्हॅन गॉगच्या चित्रांसारखा जाणीव, वेदनेला शब्दरुप देणारा शायर म्हटलं, साहिरच्या काव्यामध्ये तुटलेपणं होतं, त्यांची शायरी परिपूर्ण नव्हती, ती परिपूर्ण नसावीच, माणूस, जगणं, वेदना, जाणिवा कधीही परिपूर्ण नसतात, त्यात मागे काहीतरी उरलेलं असतंच, साहिरनं हा उरलेला अवकाश भरण्याचा प्रामाणिक परंतु अयशस्वी प्रयत्न कायमच केला, या अपयशातच त्याच्या काव्याच्या यशाचं गमक दडलेलं आहे.

सॉक्रेटीस म्हणतो त्याप्रमाणे ‘मला इतकंच माहीत आहे की, काहीच माहीत नाही’ हे ‘माणसाचं काहीच माहीत नसलेपण’ साहिरला बरोबर माहीत होतं. मात्र असं असतानाही साहिरच्या विचारांची दिशा स्पष्टच होती. जात, धर्म, ओळखीच्या पलीकडचा माणूस शोधणारा आणि त्याच्याविषयी लिहिणारा शायर साहिर होता. हेच माणूसपण त्याच्या लेखणीत कायम झिरपत आलं होतं. त्यामुळेच साहिरच्या कवितेला केवळ तत्कालीन संदर्भ नाहीत, आजही त्याची कविता तेवढीच कालातीत आहे. प्यासामध्ये ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?’ अशी प्रश्नवजा खंत मांडणारा साहिर आजच्या काळातही अनेकांच्या मनातली खंत पाच दशकांपूर्वी लिहून ठेवतो. म्हणूनच साहिरची ‘नज्म’ला वयाचं बंधन नाही, तेरे चेहरे से नजर नही हटती…म्हणणारा साहिर गद्ये पंचविशीतलाच वाटावा, त्यामुळेच कुठल्याही काळातल्या तरुणांना साहिर आपलंसं करतो.

साहिरची शायरी शब्दबंबाळ नाही, साहिरनं स्वतःला शब्दांच्या जगात हरवू दिलं नाही, त्यामुळेच तो आज सर्वच काळवेळ, वयाचं बंधन नसलेल्या सर्वच माणसांचा शायर झाला. साहिर लुधियानवी हा कवी आणि हाच माणूस, हे दोन वेगवेळे कधीही नव्हते, शायरपण त्याच्या माणूसपणावर कधीही ओझं झालं नाही. साहिरच्या शब्दांना संगीताची गरज नव्हती, जे शब्द त्याचे होते, ते त्याचेच होते. ते त्याच्यातल्या साहिर नावाच्या माणसाचे शब्द होते, कवी किंवा शायराचे नाही, साहिरच्या काव्याचे हेच गमक जावेद अख्तरांनी उलगडलं होतं.

साहिरची कुठलीही नज्म उदाहरणादाखल घ्यावी, ती पन्नास वर्षांनंतर आजही तेवढीच ताजीतवानी आहे. साहिरनं कवितेत लिहिंलंय…ज़ुल्म फिर ज़ुल्म है बढ़ता है तो मिट जाता है, खून फिर ख़ून है टपकेगा तो जम जाएगा, कुठल्याही गोष्टीच्या अतिरेकाला अंत असतोच. एका विशिष्ट मर्यादेत असेपर्यंत ती सहन करता येते, ज्या ठिकाणी ‘बरदाश्त करने की इन्तेहा’ होते त्या ठिकाणी जुल्म संपण्याची सुरुवात होते. साहिर पडद्यावरच्या गाण्यातून जेवढा उलगडलेला आहे तो तेवढाच नाही, पडद्यावरच्या गाण्यावरचा साहिर बरेचदा सिनेमांच्या सिच्युएशनवर लिहिता झालेला असतो. त्यामुळे साहिर जेवढा दिसतो तेवढाच नाही, हे हिमनगाचं टोक आहे, त्याही खाली मनाच्या खोल डोहात साहिर कित्येक मैल मानवी जाणिवांच्या गुंत्यासारखा पसरलेला असतो, म्हणूनच केवळ त्याच्या सिनेगाण्यांवरून साहिर संपूर्ण सापडत नाही. त्याचा कितीही शोध घेतला तरी तो शोध अपूर्णच राहतो.

First Published on: October 25, 2023 9:36 PM
Exit mobile version