पृथ्वीवरील नरकात गुदमरून मरणारी माणसे!

पृथ्वीवरील नरकात गुदमरून मरणारी माणसे!

सफाई कामगार ही अशिक्षित, मैला काढून काढून भेगाळलेल्या हातावर पोट असलेली निरुपद्रवी जमात असते. त्यांना घटनात्मक हक्क अधिकारांबाबत काहीच माहिती नसते. संविधान, कायदे, आर्थिक उत्पन्नाचा निर्देशांक, शेअर बाजार, दर माणसाचे सरासरी उत्पन्न, महागाई, मंदिर-मशीद वाद, जातीय, आर्थिक नीती, जातीय, धार्मिक अस्मिता असल्या कुठल्याच राजकारणात त्यांना वर्षानुवर्षे फासलेल्या दुर्गंधीवर अत्तराचं काम करत नाही.

या काळोख्या खोल गर्तेत शेकडो वर्षांपासून सफाई कामगार अडकलेले असतात. ‘सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर’ सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर हा बातमीचा घासून गुळगुळीत झालेला मथळाही पंधरा-वीस वर्षे घासून ट्यूबवर चालणार्‍या मैल्याच्या ट्रकसारखा लक्तरलेला असतो. लक्तरं, हाडांचा सापळा, असल्या नाटकीय वाक्यांमुळे पेटलेल्या मशालींचा उजेड सफाई कामगारांच्या वाल्मिकी किंवा भीम नगरातून जाताना शेकडो वर्षांपासून विझलेला असतो.

सफाई कामगारांचं मरण इतकं स्वस्त, सहज असतं की वर्तमानपत्रातल्या कोपर्‍यात सोन्याचा आजचा दर किंवा आजचे तापमान अशा चौकटीत आजचे सफाई कामगारांचे मृत्यू नोंद करणारी आकडेवारी छापण्यास पत्रकारितेला हरकत नसते. मालाडमध्ये दोन दिवसांपूर्वी दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सफाई कामगारांच्या नरकातल्या जगण्याची चर्चा होते. ‘आमच्या परिसरात डंपिंग ग्राऊंड नकोच’ म्हणून शेकडोने मोर्चे काढणारा समाज सफाई कामगारांच्या मरणावर कायमच निबर झालेला असतो. सफाई, स्वच्छता अभियानांसाठी केंद्रातल्या सरकारांकडून मोठा निधी पालिकांना मिळालेला असतो.

सफाई कामगारांना यापुढे हातमोजे, हेल्मेट, मास्क, प्राणवायू यंत्रणा पुरवणार, सफाई कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणार, त्याला शिक्षा होणार, असल्या फुटकळ आश्वासनांवर सफाई कामगार संघटनांना निकालात काढले जाते. मालाडमधल्या सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर एकाच घरातल्या कर्त्या माणसाचा मृत्यू आणि दुसरा भाऊ व्हेंटिलेटरवर असतो. संबंधित सफाई कामगारांचे आईवडील वृद्धत्वामुळे आजारी असतात, तर सफाई कामगाराची लहान मुले पोरकी झालेली असताना डोक्यावरचं छप्परच गेल्यानं सफाई कामगाराच्या पत्नीला दिलासा द्यायला कोणीच नसते.

मिथेनच्या मरणाच्या अंधार्‍या नरकात सफाई कामगाराला उतरवणारा संबंधित बांधकाम व्यावसायिक नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये द्यायला तयार असतो, सोबतच अशा गोष्टी घडत असतात…असंही तो बोलून जातो. या कंत्राटदार किंवा बांधकाम व्यावसायिकाचं असं सफाई कामगारांचे मृत्यू गृहीत धरणं हे भवतालचा सफाई कामगारांबद्दलचा दृष्टिकोन समोर आणतं. करून करून काय करेल? आणखी ५० हजार देऊन प्रकरण मिटवण्याकडे सफाई कामगारांच्या गलिच्छ मरणाला जबाबदार असलेल्यांचा कल नवा नसतो. आजपर्यंत सफाई कामगारांच्या कित्येक मृत्यूला जबाबदार असलेल्यांपैकी किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि किती जणांना शिक्षा झाली?

या प्रश्नाशी भवतालच्या समाज समुदायाला काहीही देणेघेणे नसते. त्यांच्या लेखी सफाई कामगार ही जिवंत माणसे नसतातच, त्यांना भवतालचा समुदाय यंत्रमानवच समजत असतो, अरे हो…रोबोटकडून मेनहोलची साफसफाई करण्यासाठी परदेशातून असे रोबोट महापालिकांकडून मागवलेले असतात, परंतु या रोबोटसाठी येणार्‍या खर्चाच्या तुलनेत कंत्राटी सफाई कामगारांचा पगार अतिकिरकोळ असल्यानं असे रोबोट्स आधीच डबघाईला आलेल्या महापालिकांना परवडत नाहीत. त्यामुळे सफाई कामगारांवरच हे ‘मोलाचे काम’ सोपवले जाते. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधनांसाठी पालिका किती खर्च करते?

खरेच ही सुरक्षा साधने कामगारांपर्यंत पोहचतात का? या प्रश्नांची वर्तमानपत्रातल्या कित्येक बातम्यानंतरही दखल घेतली जात नाही. सफाई कामगारांचा गटार, मेनहोल साफ करताना मृत्यू झाल्यावर कामगाराचे नातेवाईक नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतात, स्थानिक नगरसेवक, समाजसेवकांकडून गल्लीबोळातल्या इतर कामगारांना घेऊन कंत्राटदार पालिकेच्या विरोधात मोर्चा काढला जातो. त्यानंतर भावनिक भाषणे होतात, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आश्वासन दिले जाते, संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन मिळतो आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंच्चावन्न’ होतात.

दोन दिवसांपूर्वी मालाड पूर्व भागात एका ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील अठरा फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या ६८ वर्षाच्या रघू सोलंकी या सफाई कामगाराला चेंबरमध्येच चक्कर आल्यानं श्वास गुदमरून मृत्यू झाला, एका कामगाराची वेदना दुसर्‍या कामगाराला समजते या न्यायाने जवळच्या इमारत बांधकामावर असलेले आकिफ, हुसेन शेख आणि जावेद हे इमारत कामगार चेंबरमध्ये रघूला वाचवायला उतरले.

यात जावेदचाही विषारी गॅसमुळे मृत्यू झाला तर इतर दोघांची स्थिती चिंताजनक झाली. एव्हाना रघूवर अंत्यसंस्कार झालेही असतील, ‘सफाई कामगारांचा चेंबरमध्ये मृत्यू’ हा बातमीचा मथळाही आता वाचून घासून गुळगुळीत होऊन संपत गेला आहे. रघुला वाचावायला मरणाच्या नरकात उतलेल्या तरुणांचं वय अवघं २० ते २२ आणि ३९ आहे, रघुला वाचवायला गेलेल्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे आणि रुग्णालयाच्या फेर्‍या मारत आहेत, तर चेंबर साफ करण्याची जबाबदारी असलेला सुपरवायझर मनोहरन नाडर (५१) जामिनावर सुटला आहे.

मालाडच्या चेंबरमध्ये दुर्घटना झाल्यावर अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑक्सिजन मास्क घालून चेंबरमध्ये शिरकाव केला, मात्र त्यांची मास्क असतानाही घुसमट झाल्याने ते बाहेर आले, या अशा मरणाच्या नरकात कुठलीही सुरक्षा साधने न घेता उतरणार्‍या कामगारांना या नरकात उतरण्याला भाग पाडणारा भवताल हा या नरकापेक्षा जास्त भयानक आहे. मृत आणि बेशुद्ध झालेल्या चेंबरमधल्या कामगारांना बाहेर काढल्यावर त्यांच्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स नव्हती रिक्षातून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, हॉस्पिटलमध्ये रघु आणि जावेद या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या दुर्घटनेला केवळ नाडर हा सुपरवायझर जबाबदार नाही, मानवी विष्ठेने भरलेला नरक साफ करण्याचं काम देताना किमान माणुसकीचाही अभाव असलेल्या रोगट भवतालने या कामगारांचा मृत्यू झालेला आहे. सफाई कामगारांचे प्रश्न मांडणार्‍या ‘ईपीडब्लू’च्या संशोधन अहलावानुसार सफाई काम करताना कामगारांसोबत घडलेल्या दुर्घटना या बहुतांश नोंदवल्याच जात नाहीत, म्हणजेच प्रकरणे परस्पर थोडेथोडके पैसे देऊन मिटवली जातात.

खासगी बिल्डर्सकडून अशी धोकादायक गलिच्छ कामे करण्यासाठी कंत्राटदार नेमलेले असतात, आपला फायदा वाढावा यासाठी कंत्राटदाराकडून सुरक्षेसाठीची रक्कम मारून कामगारांना जमिनीखालच्या नरकात मरण्यासाठी सोडले जाते. सुरक्षेसाठीचे कामगार कायदे कागदावर राहतात. ते प्रत्यक्षात उतरत नाहीत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटार, पाईपलाईन, नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. ही कामे मशीनच्या मदतीने करण्यासाठी न्यायालयाचे आदेश आहे. मात्र निर्जीव मशीनच्या तुलनेत जिवंत कामगार सफाईसाठी स्वस्तात उपलब्ध असल्याने सफाई कामगारांचे मरणसत्र कायम सुरूच असते. सफाई कामगार हे नरक साफ करण्याच्या कामामुळे कायमच निरक्षर, विविध आजारांनी गांजलेले, व्यसनी झाल्याचे स्पष्ट आहे. वर्षानुवर्षे मैल्याचे चेंबर, मेनहोल साफ करून त्यांचे आयुर्मान हे पन्नाशी गाठली तरी ‘खूप जगला’ या चौकटीत येते. मुळातच असे कामगार असंघटित, नोंदणीकृत आणि दरिद्य्ररेषेखालील असल्याने त्यांच्या जगण्या मरण्याने भवतालला कुठलाही फरक पडत नाही.

काही महिन्यांपूर्वी विरारच्या ‘ग्लोबल सिटी’ येथील एका खासगी सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीची स्वच्छता करताना टाकीत उतरलेल्या चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने या चारही सफाई कामगारांचे मृतदेह बाहेर काढले, सफाई कामगारांच्या मरणात जातीय, प्रांतीक भेद नसतो, सगळे एकाच पद्धतीने घुसमटून, गुदमरून मरतात, विरारमधले चारही सफाई कामगार ‘मराठी’ असतानाही त्यांच्यासाठी महाराष्ट्रातले तमाम मराठीजन ‘रोजचे मढे त्याला कोण रडे’ च्या भूमिकेत असतात.

केंद्रीय सामाजिक न्याय, सबलीकरण मंत्रालयाने (एमएसजेई) दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१६ ते २०१९ या काळात सेप्टीक टँक, चेंबर्स, मेनहोल साफ करताना भारतात २८२ सफाई कामगारांचा मृत्यू झाला हा केवळ नोंदणी झालेला आकडा आहे. म्हणजेच दिवसाला एक किंवा दोन ते तीन अशी सरासरी नरकात उतरणार्‍या सफाई कामगारांच्या मृत्यूची म्हणावी लागेल. देशात स्वच्छ भारत अभियान चालवले जात असताना सफाई कामगारांविषयी भवतालच्या मनातली उदासीनतेची जातीय घाण स्वच्छ व्हायला हवी.

First Published on: April 29, 2024 10:38 PM
Exit mobile version