वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळ कारणा कारण । देखती ते ॥
मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगताला पांघरूण घालणारा त्या मला पांघरूण घालतात, भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात, मी सर्व जगाचा उत्पन्न करणारा असून मला दुसर्‍यांनी केले आहे, असे मानतात.
मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती । निरंतरातें आव्हानिती । विसर्जिती गा ॥
मी स्वयमेव असून माझ्या मूर्ति करितात. मी स्वत:सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करितात व मी नित्य सर्वत्र असताना माझे आव्हान विसर्जन करतात.
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु । मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसे ॥
मी नेहमी स्वयमेव व निराकारसिद्ध असून मला बाल्य, तारुण्य व वृद्ध अशा प्रकारचे संबंध (अवस्था) लावतात.
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें । मी अभोक्ता की भुंजे । ऐसें म्हणती ॥
मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत मानतात. मी काहीएक न करणारा असून कर्मे करितो व काही न खाणारा असून खातो, असे म्हणतात.
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती । मज सर्वांतरातें कल्पिती । अरि मित्र गा ॥
मला कुळगोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करितात. मी नित्य असून मी मरतो, असे मानून माझ्या मरणाने दु:ख करितात. तसेच मी सर्वाच्या अंतर्यामी राहणारा असून अमक्याचा शत्रू व अमक्याचा मित्र, अशी माझ्या ठिकाणी कल्पना करितात.
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेकसुखांचा कामु । आघवाचि मी असें समु । कीं म्हणती एकदेशी ॥
मी निजानंदात निमग्न असणारा, त्या मला इतर सुखांची इच्छा करणारा असे मानतात व सर्व ठिकाणी माझी व्याप्ती समान असून मला एकदेशी म्हणजे एका स्थळी राहणारा असे म्हणतात.

First Published on: February 27, 2024 4:30 AM
Exit mobile version