नामात स्वतःला विसरायला शिकावे

नामात स्वतःला विसरायला शिकावे

कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून, गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली, तर ते दुःखालाच कारण होते. नामात स्वतःला विसरायला शिकावे; असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझे चरित्र कळले; नुसत्या तर्काने ते कळणार नाही.

सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही; म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो.

मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मस्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत, हरिहरामध्ये भेद नाही असेच श्रृतिस्मृतीही सांगतात. श्रीशंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्रीशंकरापासून श्रीसमर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले, त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे; पण ज्या डोळ्यांनी देव पहायचा असतो ते हे डोळे नव्हेत. ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की, काळजी न करता, ‘परमात्मा सर्व करतो’ ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो, तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल.

First Published on: September 15, 2022 3:24 AM
Exit mobile version