अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ करावे

अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ करावे

आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात, पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही.

‘माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे,’ असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण कर्तेपण राहात नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की, त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की, त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी, त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला हरकत नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख-दुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ठ्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे.

बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा, एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य त्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला. आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल.

जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे, फारसे जड नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात राहावे.

First Published on: October 21, 2022 3:00 AM
Exit mobile version