वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

हे संग्रामीं उदित | जहाले असती कीर समस्त | पण आपणपेयां उचित | केवीं होय //
हे सर्व युद्ध करण्याकरिता तयार झाले आहेत खरे; परंतु यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्यास कसे योग्य होईल?
येणें नांवेंचि नेणों कायी | मज आपणपें सर्वथा नाहीं | मन बुद्धी ठायीं | स्थिर नोहे //
यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मला काही सुचेनासे झाले आणि मन व बुद्धी हीदेखील आपल्याजागी स्थिर राहात नाहीत.
देखें देह कांपत | तोंड असे कोरडें होत | विकळता उपजत | गात्रांसीही //
हा पहा, माझ्या सर्व अंगास कंपही सुटला आहे, तोंडास कोरड पडली आहे व गात्रेंही शिथिल झाली आहेत.
सर्वांगा कांटाळा आला | अति संतापु उपनला | तेथ बेंबळ हातु गेला | गांडिवाचा //
सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. शरीराचा भडका झाला व गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला;
तें न धरतचि निष्टलें | परि नेणेंचि हातोनि पडिलें | ऐसें हृदय असे व्यापिलें | मोंहे येणें //
त्यामुळे ते माझ्या हातून केव्हा गळून पडले हेदेखील मला समजले नाही, इतके माझे अंत:करण या नातेवाईकांच्या मोहाने व्यापिले आहे!
जें वज्रापासोनि कठिण | दुर्धर अतिदारुण | तयाहून असाधारण | हें स्नेह नवल //
त्यामुळे ते बरोबर धरले गेले नाही. जे माझे अंत:करण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे व अति निष्ठूर आहे, ते आप्तवर्गांविषयी इतके मोहीत व्हावे, हे मोठे आश्चर्य आहे.
जेणें संग्रामीं हरु जिंतिला | निवातकवचांचा ठावो फेडिला | तो अर्जुन मोहें कवळिला | क्षणामाजीं //
ज्याने युद्धात शंकरासही जिंकले व निवात-कवच राक्षसांना नामशेष केले त्या अर्जुनाला मोहाने एका क्षणांत गिळून टाकले!

First Published on: February 1, 2023 3:58 AM
Exit mobile version