वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि जळो हें झुंज | प्रत्यया न ये मज | एणें काय काज। महापापें //
म्हणून देवा, पुरे हे. मला काही ते पसंत नाही. या महापातकावाचून आमचे काय अडले आहे !
देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटें होईल झुंजतां | वर कांहीं चुकवितां | लाभु आथी //
देवा, अनेक प्रकारे विचार करून पाहतां युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल, असे वाटते; ते जर टाळले तर मात्र काही तरी कल्याण होईल.
तया विजयवृत्ती कांहीं | मज सर्वथा काज नाहीं | एथ राज्य तरी कायी | हे पाहुनियां //
अशा रीतीने जय मिळविण्याची मला मुळीच गरज नाही व असले राज्य मिळवून तरी काय करावयाचे आहे !
या सकळांतें वधावें | मग जे भोग भोगावे। ते जळोत आघवे। पार्थु म्हणे //
अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे राजभोग भोगावयाचे ते सर्व तुच्छ आहेत.
तेणें सुखेंविण होईल | तें भलतैसे साहिजेल | वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं //
हे राज्यसुख सोडल्यामुळे वाटेल ती दु:खद अवस्था जरी प्राप्त झाली तरी ती आम्ही सहन करू, फार काय, पण या भीष्मादिकांसाठी आम्ही आपले प्राणदेखील देऊ.
परी यांसी घातु कीजे | मग आपण राज्यसुख भोगिजे | हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके //
परंतु यांचा घात करून आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही.
तरी आम्हीं कां जन्मावें | कवणालागीं जियावें | जरी वडिलां यां चिंतावें विरुद्ध मनें //
जर आम्ही आमच्या या वडिलांचे मनाने अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास तरी यावयाचें कशाकरिता व जगावयाचे तरी कोणासाठी!

First Published on: February 3, 2023 4:30 AM
Exit mobile version