वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक। जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे //
कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापाप घडते, ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाचार नाहीसे होतात.
जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला | तो आणिकांहीं प्रज्वळिला | जाळूनि घाली //
ज्याप्रमाणे आपल्या घराला दुर्दैवाने आग लागली तर ती भडकलेली आग शेजारची दुसरीही घरे जाळून टाकते.
तैसिया तया कुळसंगती। जे जे लोक वर्तती | तेही बाधा पावती। निमित्तें येणें //
त्याप्रमाणे त्या कुळाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात.
तैसें नाना दोषें सकळ | अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी //
अर्जुन म्हणतो- देवा त्याप्रमाणेच त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुळ भयंकर नरकवास मात्र भोगते.
पडिलिया तिये ठायीं | मग कल्पांतींही उकलु नाहीं | येसणें पतन कुळक्षयीं | अर्जुन म्हणे //
अर्जुन आणखी म्हणतो, त्या नरकांत पडल्यावर मग कल्पान्तीही तेथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अध:पात होतो.
देवा हें विविध कानीं ऐकिजे | परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे | अवधारीं पां //
देवा, हे सर्व आम्ही आपल्या कानांनी ऐकावे तरीसुद्धा मनात अजून या पापाला भिऊ नये, उलट ते करण्यासाठी आपले हृदय वज्राचे बनवावे की काय याचा आपणच विचार करा.
अपेक्षिजे राज्यसुख। जयालागीं तें तंव क्षणिक | ऐसें जाणतांही दोख। अव्हेरूं ना //
असे पहा की, कुलक्षय करून ज्याच्याकरिता राज्यसुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणभंगूर आहे. असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय?

First Published on: February 11, 2023 4:20 AM
Exit mobile version