वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तर्‍ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा ||
त्याप्रमाणे, वाटेल तसा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला, तरी तोच परलोकाचा सोबती आहे.
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ? ||
असे पहा की, दूध आणि साखर हे दोन पदार्थ गोड आहेत, म्हणून प्रसिद्ध आहे. पण ज्यांना जंत झाले आहेत, त्यांना ते कुपथ्य आहेत. त्यांनी ते कसे खाल्ले करावे?
ऐसेनिही जरी सेविजेला । तरी ते अळुकीचि उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ||
अर्जुना, इतक्यावरही जर रोग्याने ते खाल्ले तर त्याचा तो हटवादीपणाच आहे. कारण, परिणामी ते त्यास हितकर होणार नाहीत.
म्हणौनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ||
म्हणून, आम्हाला हित विचारशील तर जे दुसर्‍यास उचित असून आपल्यास अनुचित आहे, त्याचे आचरण करू नये.
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ||
स्वधर्माचे आचरण करीत असताना जरी आपला जीव खर्ची पडला, तरी तो दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असा मानला जातो.
ऐसें समस्त सुरशिरोमणी । बोलिले जेथ शार्ङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ||
देवाधिदेव श्री शार्ङ्गपाणी यांचे हे भाषण ऐकून अर्जुन म्हणाला :- देवा, माझी एक विनंती आहे.
हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें । परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ||
आपण जे मला आता सांगितले, ते मी सर्व नीट ऐकिले; तर आता मला जे काही पाहिजे आहे ते मी विचारतो.

First Published on: May 23, 2023 4:00 AM
Exit mobile version