वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली तुझीच कृपा ॥
तू संसाराने तापलेल्या लोकांची छाया व दीन जनांची माता आहेस; आणि खरोखर आमचा जन्म तुमचेच कृपेपासून झाला आहे.
देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे । हें बोलों काय तुझें तुजचि पुढां ॥
देवा, आईला पांगळे मूल झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो, हे सर्व तुम्ही जाणता; तर आम्ही तुमच्यापुढे तुमचे महत्त्व काय बोलावे?
आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं । तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥
आता मी जे काही विचारणार आहे, त्याकडे चांगले लक्ष द्यावे व त्या गोष्टीचा राग मनात आणू नये.
तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥
हे अनंता, तुम्ही जी मागील गोष्ट म्हणून सांगितली, (सूर्याला हा कर्मयोग मी सांगितला त्याची) ती माझ्या मनाला पटत नाही.
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला? ॥
सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांनासुद्धा माहीत नाही. तर त्याला आपण कधी व कसा उपदेश केला?
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा । म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥
तो सूर्य तर फार जुनाट आहे, असे ऐकतो आणि आपण तर श्रीकृष्णा, हल्लीचे. म्हणून या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो.

First Published on: June 6, 2023 1:11 AM
Exit mobile version