वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृतीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ॥
असे जे प्रशस्त अनुभावाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे, असे जाणून
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ॥
मग वाढत्या प्रेमाने मला भजतात, पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे, अशा दुसरेपणाला शिवत नाहीत.
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥
अर्जुना याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्याची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे, तो ऐक.
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे । जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥
तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले.
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं । यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥
यम-दमास निस्तेजता आणली, तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठपदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते, पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले.
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें । तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥
यमसाधन म्हणावयास लागले की निग्रह कोणाचा करावा? (कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले.) दमसाधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे? (कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली.) तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही, तर आम्ही खावे काय?

 

First Published on: March 4, 2024 4:30 AM
Exit mobile version